भूम (प्रतिनिधी)-   येथील तालुका क्रीडा संकुल येथे आयोजित 1 दिवसीय जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत स्वराज्य भूम संघाने दमदार खेळाचे प्रदर्शन करत अंतिम सामन्यात शिवप्रतिष्ठान परंडा संघावर एकतर्फी विजय मिळवला. या स्पर्धेत एकूण 8 संघांनी सहभाग नोंदवला होता. सदरील स्पर्धा बाद पद्धतीने घेण्यात आल्या.

अंतिम सामना स्वराज्य भूम विरुद्ध शिवप्रतिष्ठान परंडा यांच्यात रंगला. सामन्यात सुरुवातीपासूनच स्वराज्य संघाने आक्रमक खेळ करत 27 गुणांची कमाई केली. तर शिवप्रतिष्ठान परंडा संघाला 17 गुणांवर समाधान मानावे लागले. तब्बल 10 गुणांनी विजय मिळवत स्वराज्य संघाने स्पर्धेवर आपले वर्चस्व सिद्ध केले. अंतिम सामन्यात विश्वजीत सुपेकर 8, निलेश व्हरे 5, व साहिल जरडकर 3, यांनी नेत्रदीपक कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या स्पर्धा यशस्वी रीत्या पार पाडण्यासाठी स्वराज्य स्पोर्ट्स यांच्या वतीने परिश्रम घेण्यात आले. पंच म्हणून कबड्डी असोसिएशनचे रमेश माळी व दत्तात्रय जावळे यांनी जबाबदारी सांभाळली. तर स्पर्धेचे सूत्रसंचालन व अचूक समालोचन ॲड. सिराज मोगल यांनी केल्याने उपस्थित क्रीडा रसिकांचे विशेष लक्ष वेधले. या प्रसंगी अप्पासाहेब हुंबे, नाना मदने, ॲड. सिराज मोगल, अमर जमादार, बुबकर जमादार, अमर सुपेकर, दिगंबर बाबर आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन व यशस्वी आयोजनामुळे क्रीडाप्रेमींमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.


या मान्यवरांनी दिले बक्षिस

प्रथम पारितोषिक 25 हजार रुपये दत्ताभाऊ भोरे जि. प. सदस्य पाथरूड, द्वितीय पारितोषिक 15 हजार विशाल ढगे कृ. उ. बा. स. संचालक, तृतीय पारितोषिक 11 हजार भाऊसाहेब मारकड व स्पर्धेसाठी विशेष सहकार्य म्हणून 11 हजार रुपये बालाजी काळे जि. प. सदस्य वालवड यांनी दिले आहे.

 
Top