धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती ही देशातील संत महात्मे यांनी चालविलेला प्रबोधनाचा वारसा चालवत आहे. संतांनी समाजातील अज्ञान, अंधश्रध्दा दूर करण्याचा प्रयत्न केला. बुध्दांनी व्यक्तीला तर्कनिष्ठ विचार करायला शिकवले. महात्मा बसवेश्वर, संत तुकाराम, संत कबीर, संत गाडगेबाबा इत्यादी संतांनी समाजातील अंधश्रध्दा नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. समाजानी विज्ञाननिष्ठ बनले पाहिजे. प्रत्येक धर्माची कालसुसंगत चिकित्सा झाली पाहिजे. असे आवाहन महाराष्ट्र राज्य अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराने यांनी केले आहे.
भारतीय संविधान विज्ञानवाद शिकवते त्यांचे अनुकरण केले पाहिजे. सध्या श्रध्देच्या नावाखाली महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात स्त्री-पुरुषांचे शोषण होत आहे हे निषेधार्य आहे. याचा समाजातूनच निषेध झाला पाहिजे. समाजातील व्यक्तींनी विवेकशिल वागले पाहिजे. यासाठी डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांचाच वारसा महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती आजही चालवत आहे. या चळवळीमध्ये ज्यांना कार्याची आवड आहे. त्या स्त्री पुरुषांनी सहभागी होवून कार्य वाढवले पाहिजे. विशेषत: तरुण-तरुणींनी, युवक युवतींनी या चळवळीत कार्य केले पाहिजे असे आवाहन डॉ. ठकसेन गोराने महाराष्ट्र राज्य अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे प्रधान सचिव यांनी धाराशिव येथे अनिस च्या बैठकीत मार्गदर्शन करताना केले. सुरुवातीस अनिसचे शेख सजियोद्दीन, सिध्देश्वर बेलूरे, विजय गायकवाड यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. बैठकीस मोहन शेवाळे, रमेश गवळी, संतराम पौळ, निळकंठ कोळगे, संतोष कोकाटे व शहरातील अनिसचे सभासद, कार्यकर्ते उपस्थित होते.
