धाराशिव (प्रतिनिधी)- शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन वेगवेगळ्या व्यक्तींना तब्बल 20 लाख रुपयांना गंडा घालल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मोहन माधवराव कदम (रा. कामेगाव, ता. जि. धाराशिव), प्रशांत सुंदरराव कुलकर्णी व प्रविण सुंदरराव कुलकर्णी (दोघे रा. धाराशिव) यांनी संगनमत करून फिर्यादी व्यंकट महादेव वाघमारे (वय 64, रा. कामेगाव) यांना त्यांच्या मुलाला शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. यासाठी आरोपींनी वाघमारे यांच्याकडून 12 लाख रुपये घेतले. तसेच, याच आरोपींनी गावातील समाधान गुळीक यांनाही शासकीय नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत त्यांच्याकडून 8 लाख रुपये उकळले. मात्र, कोणतीही नोकरी न लावता आरोपींनी दोघांचीही आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी व्यंकट वाघमारे यांनी 26 एप्रिल 2026 रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय दंड संहिता कलम 420 व 34 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीसांकडून पुढील तपास सुरू आहे.