धाराशिव (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती धाराशिव येथील पोस्ट ऑफीस मुख्यालयात मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये धाराशिव विभागाचे डाक अधिक्षक प्रशांत मालकर साहेब, प्रमुख पाहूणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण प्राप्त विजय गायकवाड, पोस्ट मास्टर गोवर्धन साहेब यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा फुले, संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पुजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख उपस्थित, प्रमुख पाहूणे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. यावेळी मालकर साहेब यांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संदेशाचे विस्तृत विवेचन केले. प्रमुख पाहूणे विजय गायकवाड यांनी बाबासाहेब आंबेडकर व जीवन कार्य या विषयावर सविस्तर मांडणी केली. मानगाव परिषद महाडचा चवदार तळयाचा सत्याग्रह, भारतीय संविधान निर्मिती याबाबतही सविस्तर माहिती सांगितली. अध्यक्षीय समारोपात गोवर्धन साहेब यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात पुस्तकांचे महत्त्व विशद केले. दिपक केंगार यांनीही यावेळी विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमोल जाधव यांनी केले. प्रास्ताविक स्वप्नील बनसोडे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन अमोल ढाकरे, विश्वजीत ढावारे, गणेश गुरव, मरगणे साहेब यांनी केले. कार्यक्रमास पोस्ट ऑफीस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. अमोल ढाकरे यांनी सर्वांचे आभार मानले.
