धाराशिव (प्रतिनिधी)-  मार्च महिना संपल्यानंतर दरवर्षी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेला वेग येतो. विशेषतः शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया एप्रिलपासून सुरू होऊन पुढील तीन महिने सुरू राहते. मात्र, यंदा या प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला असून, संपूर्ण देशभरातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना 31 मार्च 2027 पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.

केंद्रीय गृहसचिव यांनी यासंदर्भातील स्पष्ट निर्देश दिले असून, देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्राद्वारे सूचना पाठवण्यात आल्या आहेत. या निर्णयामागे ‌‘जनगणना 2027‌’ची मोठी पार्श्वभूमी असून, सध्या देशभरात जनगणनेची पूर्वतयारी युद्धपातळीवर सुरू आहे. यावेळची जनगणना पूर्णपणे डिजिटल स्वरूपात होणार आहे.

नागरिकांना ‌‘स्वयं-गणना‌’ करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात घरनोंदणी व घरांची गणना केली जाणार असून, एप्रिल ते सप्टेंबर 2026 दरम्यान राज्य सरकार निश्चित करणाऱ्या 30 दिवसांच्या कालावधीत हा टप्पा पूर्ण केला जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना फेब्रुवारी 2027 पासून सुरू होणार आहे.


स्पष्ट आदेश

केंद्रीय गृहसचिवांनी आपल्या पत्रात स्पष्ट नमूद केले आहे की, जनगणनेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची बदली ही जनगणना पूर्ण होईपर्यंत म्हणजेच 31 मार्च 2027 पर्यंत करण्यात येऊ नये. राज्यांच्या मुख्य सचिवांनीही आपल्या स्तरावर याची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे यंदा जनगणनेसाठी नियुक्त शिक्षक व शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या थांबणार असल्याचे स्पष्ट झाले असून, संपूर्ण यंत्रणा जनगणना 2027 यशस्वी करण्यासाठी सज्ज होत आहे.

 
Top