भुम (प्रतिनिधी)-  एलपीजी गॅस सिलिंडर तुटवड्याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील नागरिकांना बसत आहे. बुकिंग प्रक्रियेत अडथळे, डीएससी क्रमांकासंबंधित समस्या आणि अपुरा पुरवठा यामुळे गॅस वितरणात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. परिणामी, अनेक गावांमध्ये सध्या गॅसचे वाटप ठप्प झाले आहे.

ग्रामीण भागात गॅस वितरण करताना एजन्सी कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत एका गावात एजन्सी कर्मचाऱ्यांना अडवून बुकिंग नसतानाही सिलिंडर घेण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली. यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर रत्नमाला गॅस एजन्सीकडून पोलिस संरक्षणाची मागणी करण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात पुरवठा अपुरा असल्याने समस्या अधिकच गंभीर बनत आहे. सध्या 8 मार्चपर्यंत बुकिंग सिलिंडरची संख्या 4,194 इतकी असून, कंपनीकडून केवळ 450 सिलिंडरचा पुरवठा होत आहे. त्यामुळे मागणी व पुरवठ्यात मोठी तफावत निर्माण झाली आहे. दरम्यान, भूम येथील एजन्सीसमोर नागरिकांना उन्हात तासन्‌‍ तास रांगेत थांबावे लागत असून, अनेकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शेतकरीवर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी वृद्ध महिला स्वतः सिलिंडर वाहून नेतानाचे चित्रही दिसून येत आहे. दरम्यान, गॅस सिलिंडरचा पुरवठा तातडीने सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


वितरणासाठी पोलिस संरक्षणाची मागणी

गॅस सिलिंडर टंचाईमुळे निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रत्नमाला गॅस एजन्सीकडून 26 मार्चला पोलिस संरक्षणाची मागणी करण्यात आली. मात्र, अद्याप संरक्षण उपलब्ध न झाल्याचे एजन्सीचे सुशील धावारे यांनी सांगितले.


 
Top