धाराशिव (प्रतिनिधी)-  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष,संत गाडगे महाराज जयंतीचे १५० वे वर्ष तसेच महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह’ ८ ते १४ एप्रिल २०२६ दरम्यान साजरा करण्यात येत आहे.या कालावधीत जिल्ह्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रम,शिबिरे व विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी,आज १० एप्रिल रोजी सामाजिक न्याय भवन, धाराशिव येथील सभागृहात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती.अर्चना पाटील यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून झाली.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती.प्रियंवदा म्हाडदळकर, धाराशिव नगर परिषद नगराध्यक्षा श्रीमती. नेहा काकडे,समाज कल्याणचे सहायक आयुक्त सचिन कवले,महिला व आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुखदेव चिंचोलकर,जिल्हा कोषागार अधिकारी .अर्चना नरवाडे,जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक अमोल बळे, व्याख्याते महेंद्र चंदनशिवे,प्रा.राजा जगताप,श्रीमती वनिता डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.

महिला मेळाव्यात जिल्हाभरातील महिला व बचत गटांच्या सदस्यांना मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील म्हणाल्या की,भारतीय संविधानाने महिलांना समानतेचा हक्क दिला असून आर्थिक अडचणींना खचून न जाता शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन स्वयंरोजगार निर्माण करणे आवश्यक आहे.महिला बचत गटांच्या माध्यमातून विविध व्यवसाय सुरू करून जिल्ह्याचे नाव सर्वदूर पोहोचवावे,असे आवाहन त्यांनी केले.ग्रामीण भागातील महिलांनी अंधश्रद्धेला बळी न पडता विज्ञाननिष्ठ व बुद्धिनिष्ठ दृष्टिकोन स्वीकारणे ही आजची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती.प्रियंवदा महाडदळकर यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की,भारतीय संविधानातून मिळालेल्या लोकशाही,समता व समानतेच्या हक्कांमुळे महिलांना शिक्षणाची संधी उपलब्ध झाली असून त्यातून नारीशक्ती अधिक सक्षम होत आहे.शिक्षणामुळे महिलांमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडत असून त्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत आहेत.असे त्या म्हणाल्या.

महिला व आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक सुखदेव चिंचोळकर यांनी सांगितले की,माविमच्या माध्यमातून २००७ पासून महिला बचत गटांना आर्थिक साक्षरतेचे प्रशिक्षण दिले जात आहे.बचत गटांनी तयार केलेली उत्पादने ॲमेझॉनसारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.सेंद्रीय शेती,महिला आरोग्य, स्त्री-पुरुष समानता आणि जीवामृत या विषयांवर उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल ज्ञानदीप लोकसंचलित साधन केंद्र (उमरगा),समता लोकसंचलित साधन केंद्र (परंडा) आणि नवप्रभा लोकसंचलित साधन केंद्र (कळंब) या कार्यालयांना ‘नवतेजस्विनी’ प्रकल्पांतर्गत प्रत्येकी ५० हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.या पारितोषिकांचे धनादेश अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.याच कार्यक्रमात २०२५-२६ या वर्षात महिला व आर्थिक विकास महामंडळ,धाराशिव यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याने विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी व्याख्याते महेंद्र चंदनशिवे, प्रा.राजा जगताप,जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती.अर्चना नरवाडे, नगराध्यक्षा श्रीमती.नेहा काकडे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक अमोल बळे तसेच श्रीमती वनिता डोंगरे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास बचत गटांच्या महिला, नागरिक,विद्यार्थी,पत्रकार तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याणचे सहायक आयुक्त सचिन कवले यांनी केले.

 
Top