धाराशिव (प्रतिनिधी)- परंडा येथील तहसीलदार निलेश काकडे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, तसेच महसूलमंत्री यांना सोमवार (दि. 20 एप्रिल) रोजी जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्यामार्फत निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, तहसीलदार निलेश काकडे हे बुधवार 15 एप्रिल रोजी कार्यालयीन कामकाज आटोपून खाजगी वाहनाने बाहेर पडत असताना तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर योगेश मिटकरी (रा. पिठापुरी, ता. परंडा) व अन्य एका व्यक्तीने त्यांची गाडी अडवली. यावेळी संबंधितांनी मोठ्याने आरडाओरडा करत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच वाहनाच्या काचांवर जोरजोरात मारत तहसीलदारांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला.
चांदणी नदीकडे जात असताना देखील संबंधितांनी गाडी अडवून शासकीय कामात अडथळा निर्माण केला आहे. ‘मी दिलेल्या निवेदनावर कारवाई का केली नाही?’ असा जाब विचारत त्यांनी हुज्जत घालत तत्काळ कारवाई न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
तहसीलदारांकडे विविध विषयांवरील निवेदने नियमित येत असतात. संबंधित विषयानुसार ती निवेदने संबंधित विभागांकडे पाठवून त्यावर आवश्यक कार्यवाही करण्याची प्रशासकीय पद्धत आहे. मात्र, अशा प्रकारे असंविधानिक मार्गाचा अवलंब करत तालुका दंडाधिकाऱ्याला धमकावणे ही गंभीर बाब असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.
या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष तहसीलदार डॉ. मृणाल जाधव, नायब तहसीलदार उपाध्यक्ष संतोष पाटील, नायब तहसीलदार महिला प्रतिनिधी विशाखा बलकवडे, नायब तहसीलदार, सचिव सचिन पाटील नायब तहसीलदार, कोषाध्यक्ष महादेव शिंदे नायब तहसिलदार, तहसीलदार प्रकाश मेहत्रे, रणजितसिंह कोळेकर, जयवंत पाटील, हेमंत ढोकले, निलेश काकडे, दत्तात्रय गायकवाड व नायब तहसीलदार स्वामी जी. एस. , आर. एल. बंगाळे, पूजा गोरे, प्रियंका लोखंडे, विजयकुमार बाडकर, आदींच्या सह्या आहेत.
