धाराशिव (प्रतिनिधी)-  छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कथित अवमानास्पद वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ धाराशिव शहरातील शिवभक्त आज आक्रमक झाले. धीरेंद्र कृष्ण शास्त्री (बागेश्वर) यांच्यावर देशद्रोहासह कठोर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

शिवभक्तांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे अधिष्ठान असून त्यांच्या विषयी होणारा प्रत्येक अवमान हा महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला असल्याचे नमूद करण्यात आले. महाराजांविषयी अवमानास्पद, असभ्य आणि इतिहासाचा विपर्यास करणारी विधाने सहन केली जाणार नाहीत, असा इशाराही देण्यात आला. 

दरम्यान, या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री कार्यालय तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयालाही देण्यात आली. या निषेध आंदोलनास धनंजय शिंगाडे, बलराज रणदिवे, उमेश राजेनिंबाळकर, अभिजीत सूर्यवंशी, प्रवीण सूर्यवंशी, रोहित पडवळ, ॲड. धैर्यशील सस्ते, आकाश मुंडे, संजय मुंडे, शेखर घोडके, धनंजय राऊत, ॲड.मनिषा पाटील, सुमती तोरमाले, अमर माळी, अभिषेक बागल, पृथ्वीराज चिलवंत, राजाभाऊ साळुंके, शेषराव उंबरे, सुनील आंबेकर, राजकुमार भोसले, सुमित बागल, पंकज भोसले, संतोष घोरपडे, रोहित बागल, इलियास मुजावर, उस्मान कुरेशी त्यांचे सह शिवभक्त मोठ्या संख्येने सामील झाले होते.


अशा प्रवृत्तीवर कारवाई करावी

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी सार्वजनिक कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवित संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. तसेच यापूर्वीही राहुल सोलापूरकर, भगतसिंह कोशारी, जैन मुनि कोरडकर, छिंदम यांच्यासह विविध व्यक्तींनी शिवरायांविषयी आक्षेपार्ह विधाने केल्याचा उल्लेख करण्यात आला. अशा प्रवृत्तींवर कारवाईचा अभाव असल्याने त्यांना जणू मोकळे रान मिळत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच बागेश्वर बाबाला कोल्हापुरी चप्पलने मारहाण केल्यास शिवभक्तांकडून 1 लाख 51 हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले.


लोकप्रतिनिधींनी जबाबदार भाषा वापरावी

याचबरोबर आमदार संजय गायकवाड यांनी ‌‘शिवाजी कोण होता‌’ या पुस्तकाच्या लेखकाविषयी वापरलेल्या कथित अर्वाच्य भाषेचाही निषेध करण्यात आला. लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक जीवनात संयमित व जबाबदार भाषा वापरावी, अशी मागणी शिवभक्तांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असून त्यांच्या नावावरून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. भविष्यात महाराष्ट्राच्या महापुरुषांविषयी कोणीही अवमानास्पद वक्तव्य करणार नाही, यासाठी शासनाने कठोर धोरण जाहीर करावे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.

 
Top