धाराशिव (प्रतिनिधी)- नारीशक्ती वंदन विधेयकाला विरोध करून काँग्रेस आणि उबाठा गटाने महिलांच्या हक्कांवर गदा आणली आहे. संसदेत या ऐतिहासिक विधेयकाच्या विरोधात मतदान करून खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी जिल्ह्यातील महिलांना राजकीय सशक्तीकरणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. महिलांचा हा अपमान जनता कधीच माफ करणार नाही, असा घणाघाती आरोप भाजप महिला मोर्चा अध्यक्षा प्रीती कदम व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी केला आहे.
त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना निर्णय प्रक्रियेत 33 टक्के आरक्षण देऊन त्यांना सक्षम करण्यासाठी ऐतिहासिक पाऊल उचलले होते. मात्र, काँग्रेस आणि उबाठा गटाने पुन्हा एकदा केवळ राजकारणाला प्राधान्य दिले. हे विधेयक केवळ कायदा नव्हता, तर खरी समानता प्रस्थापित करण्याचा एक क्रांतिकारी टप्पा होता. धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान करणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे. यामुळे स्थानिक ते राष्ट्रीय पातळीवर महिलांना मिळणारी नेतृत्वाची संधी हुकली असून, वर्षानुवर्षे चालत आलेली असमानता कायम ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. सभागृहात विधेयक मंजूर न झाल्याने विरोधकांनी जो जल्लोष केला, तो देशातील तमाम माता-भगिनींचा अपमान आहे, अशी टीकाही कदम यांनी केली.
शिवसेना पक्षाच्यावतीने निषेध
धाराशिवमध्ये महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी धाराशिव येथे काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी विरोधात जोरदार घोषणाबाजी करत या विधेयकाच्या निषेधार्थ निषेध व्यक्त करण्यात आला.
शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांचा सन्मान म्हणजेच महिलांना अधिकार या भूमिकेतून अनेक योजना आणल्या आहेत. यावेळी तुळजापूर जिल्हाप्रमुख मीनाताई सोमाजी, जिल्हा संघटक किरण ताई निंबाळकर, जिल्हा समन्वयक संगीताताई काळे, तालुकाप्रमुख मायाताई चव्हाण, रूपाली घाडगे, लता हरवलकर, विजया पवार, श्रावणी पवार, सुषमा शिंदे, सुवर्णा सलगर, ज्योती लोखंडे, पल्लवी माने सह अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
