धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्याच्या सर्वांगीण आर्थिक कायापालटासाठी आणि स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलण्यात आले आहे. आगामी आर्थिक वर्षात जिल्ह्यात 108 नवयुगीन उद्योजक घडवण्याचा संकल्प करण्यात आला असून, या उपक्रमाला जिल्हभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. धाराशिवच्या आर्थिक विकासासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केलेल्या आवाहनाल प्रतिसाद देत आतापर्यंत तब्बल 591 इच्छुकांची नावनोंदणी केली आहे. या सर्व इच्छुकांकडून एक प्रश्नावली भरून घेण्यात येणार असून यातून छाननी करून 108 निवडण्यात येणार असून 1 मे रोजी मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता नोकरी देणारे बनावे, या उद्देशाने ही अभिनव संकल्पना मांडत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा भाजपाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. 1 एप्रिलपासून सुरू झालेल्या नोंदणी प्रक्रियेत आतापर्यंत तब्बल 591 इच्छुकांनी अर्ज केले आहेत. अजूनही नोंदणी सुरू आहे.या माध्यमातून जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात उद्योगांचे जाळे विणले जाणार आहे. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे निवडक उमेदवारांना केवळ कागदोपत्री मार्गदर्शन न देता, प्रत्यक्षात उद्योग उभारणी पूर्ण होईपर्यंत सहकार्य केले जाणार आहे. यात प्रामुख्याने उद्योगासाठी आवश्यक तांत्रिक प्रकल्प अहवाल () तयार करणे, बँकांकडून सुलभ कर्जपुरवठा आणि शासकीय अनुदान मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न, केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे, उत्पादित मालाच्या विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे आदी बाबींचा समावेश असणार आहे. प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र सनियंत्रण समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती अर्जांची छाननी करून उद्योगाची व्यवहार्यता तपासेल. पात्र उमेदवारांची निवड पूर्णपणे गुणवत्तेवर आणि प्रकल्पाच्या यशस्वीतेवर आधारित असेल. या मोहिमेत पारंपरिक उद्योगांऐवजी आधुनिक आणि मागणी असलेल्या व्यवसायांवर भर देण्यात आला आहे. हायड्रोपोनिक शेती,नारळ शेंड्याचे (कोयर) पावडर,प्लास्टिक कचऱ्यापासून ग्रॅन्युल्स निर्मिती,व्हॅनिला शेती,केशर शेती,शेवग्याची (मोरिंगा) पावडर,कांदा पावडर,सोलर ड्रायर (सौर वाळवणी),मोती निर्मिती,पेपर बॅग निर्मिती,सोया उत्पादने,पर्यावरणपूरक म्हणून प्लास्टिक रिसायकलिंग, बायोमास हरित इंधन, फुलांपासून अगरबत्ती. आणि भविष्यवेधी तंत्रज्ञानावर आधारित म्हणून ई-वेस्ट, सोलर पॅनल स्क्रॅप आणि लिथियम बॅटरी रिसायकलिंग आदी उद्योगांचा प्राधान्याने विचार केला जाणार आहे.
महाराष्ट्रदिनी मेळाव्यातून होणार दिशा निश्चिती
या मोहिमेचा पुढील टप्पा 1 मे रोजी पार पडणार आहे. धाराशिव येथे त्यासाठी विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत पहिल्या टप्प्यात निवडक उमेदवारांना उद्योग उभारणीची पुढील दिशा आणि तांत्रिक मार्गदर्शन दिले जाईल. या उपक्रमातून 108 सक्षम उद्योजक तयार होतील, ज्यातून हजारो कुटुंबांना थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळेल.दुसऱ्या टप्प्यात उर्वरित उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या आर्थिक प्रगतीसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.
