तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर खुर्द येथील नगरपालिकेच्या वतीने सुमारे 1 कोटी 60 लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेले मल्टिपर्पज टर्फ ग्राउंड पहिल्याच अवकाळी पावसात अक्षरशः पाण्यात गेले असून, या प्रकल्पाच्या कामाच्या दर्जावर नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
अवकाळी पावसासोबत आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे ग्राउंडवरील कृत्रिम गवत (टर्फ) उखडले गेले असून अनेक ठिकाणी पृष्ठभाग पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. तसेच, मैदानाभोवती उभारलेली सुरक्षा जाळी तुटली असून काही लोखंडी संरचनाही वाकल्या किंवा कोसळल्या आहेत. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, एवढ्या मोठ्या निधीतून उभारण्यात आलेले ग्राउंड इतक्या लवकर खराब होणे हे धक्कादायक असून कामाच्या गुणवत्तेबाबत संशय निर्माण झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, योग्य अँकरिंग, मजबूत बेस आणि दर्जेदार साहित्याचा वापर न झाल्यास अशा प्रकारचे नुकसान होऊ शकते. दरम्यान, संबंधित यंत्रणांनी तातडीने पाहणी करून दोषींवर कारवाई करावी व ग्राउंडची दुरुस्ती करून खेळाडूंना सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
