तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या तुळजाभवानी मंदिर नगरीत गेल्या काही दिवसांत गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्याने शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हाणामाऱ्या, चोरी, गुंडगिर, गोळीबार तसेच भाविकांवरील मारहाणीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे धार्मिक तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजापूरमध्ये शांतता लाभणार का ? असा प्रश्न जेष्ठ नागरिकांनी उपस्थित केला आहे.
गेल्या मंगळवारी सायंकाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उदय हॉटेल परिसरात जुन्या वादातून दोन तरुणांनी मिळून एका युवकावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात आनंद चांगदेव जानराव (रा. बोरी) गंभीर जखमी झाला असून, त्याला वाचवण्यासाठी धावून आलेले त्याचे चुलत भाऊ साहिल व महेश जानराव हेही जखमी झाले आहेत. तिघांवर सध्या उपचार सुरू असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शहरात अवैध धंदे सट्टा, पत्याचे क्लब, चकऱ्यासह धंद्यात वाढ झाली आहे. शहराच्या मुख्य भागावर काही भागात उघडपणे टपऱ्यांवर मटका घेतला जात असल्याचे नागरिक सांगत आहेत.
शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे भाविक व स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे ठोस कारवाईची मागणी केली आहे. प्रत्यक्ष पातळीवर गुन्हेगारीवर नियंत्रण दिसून येत नसल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शहरात कडक पोलीस बंदोबस्त वाढवावा, अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई करावी, नियमित गस्त व नाकाबंदी वाढवावी, गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून कायद्याचा धाक निर्माण करावी. अशी मागणी शहरवासीयातून होत आहे. एकूणच, तुळजापूरसारख्या धार्मिक व पर्यटनस्थळी वाढती गुन्हेगारी ही चिंतेची बाब ठरत असून, नागरिकांचा विश्वास परत मिळवण्यासाठी पोलीस व प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.