उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा तालुक्यातील नाईचाकूर येथील नागरिकाला शासनाने आजपर्यंत कबाला मालकी प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आदेशीत करून त्याची अंमलबजावणी उपविभागीय अधिकारी करीत नसल्याने आदेशाचे उल्लंघन व कर्तव्यास कसूर झाल्यामुळे आमरण उपोषणास बुधवार दि. 15 एप्रिल रोजी पासून तहसील कार्यालयासमोर सुरू करण्यात आले आहे. 

उमरगा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाईचाकूर येथील मारूती प्रेमनाथ पवार यांच्या नावे पुनर्वसीत घर क्रं. ब - 299 लाभार्थी यादीमध्ये मंजूर असून मालकी हक्कामध्ये आहे. परंतु आज पर्यंत घराचा कबाला मालकी प्रमाणपत्र मिळाले नाही. रितसर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विनंती अर्ज करून कबाला करण्यास विनंती केली होती. गाव पातळीवर ग्राम समितीने घराची वर्गवारी अ, ब, क. या प्रमाणे करून क्षेत्र, बांधकाम किती हे या यादीमध्ये समाविष्ट केले होते. ती यादी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

शासकीय नियमानुसार जिल्हाधिकारी यांनी भूकंपातील महाराष्ट्र शासनाने काढलेल्या निर्णयाचा आधार घेत अर्जदार विनोद पवार यांना आदेशीत करून अस्वस्थ केले व शासकीय नियमानुसार बांधकामासह एकुण क्षेत्र 2520 चौरस फुटाचे मालकी कबाला प्रमाणपत्र देण्याचे आदेशित केले. परंतु उपविभागीय अधिकारी उमरगा यांनी आम्हाला कबाला मालकी प्रमाणपत्र देता येत नाही आमच्या वतीने केवळ बांधकाम केलेल्या 400 चौरस फुटाचा कबाला मालकी प्रमाणपत्र देणार असे लेखी पत्र दिले. उर्वरित खुल्या जागेचा कबाला मालकी प्रमाणपत्र देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

तातडीने माझ्यासोबत उमरगा व लोहारा तालुक्यातील पुनर्वसन गावचे कबाले मालकी प्रमाणपत्र वाटप होईपर्यंत तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशाचे उल्लंघन व कर्तव्यास कसूर झाल्यामुळे शासनास रितसर लेखी पत्र देवून आमरण उपोषणाला सुरुवात केली असल्याचे म्हटले आहे.


उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी या वरिष्ठांना आपले म्हणणे तात्काळ कळवून आपणास न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे मत उमरगा येथील तहसीलदार गोविंद येरमे यांनी उपोषण स्थळी भेट देवून उपोषण कर्त्याला सांगितले आहेत.


 
Top