धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्ह्यातील 132 गावांसाठी संपर्क अधिकाऱ्यांच्या नियुक्ती संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच आढावा बैठक आयोजित करण्यात आली.ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली.बैठकीस सर्व तहसीलदार,सर्व गटविकास अधिकारी तसेच सर्व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत तालुकास्तरावर निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये संबंधित योजनेची प्रभावी व व्यापक प्रचार-प्रसिद्धी करण्यात यावी,अशा सूचना देण्यात आल्या.तसेच विविध विभागांच्या योजनांचे अभिसरण साधून गाव हा विकासाचा केंद्रबिंदू मानून क्षेत्रीय पातळीवर सर्वांगीण व समन्वित विकास साधण्यावर भर देण्यात यावा, असे निर्देश देण्यात आले.  प्रत्येक नियुक्त संपर्क अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील गावांना महिन्यातून किमान दोन वेळा भेट देऊन योजनांची अंमलबजावणी, प्रगती व अडचणींचा आढावा घ्यावा तसेच संबंधित बाबींचा नियमित पाठपुरावा करावा,अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत विविध घटकांमध्ये लाभार्थी अर्जाची संख्या वाढविण्यासाठी विशेष मोहिमा राबविणे तसेच जल व मृदसंधारणाची कामे प्राधान्यक्रमाने क्षेत्रीयस्तरावर तातडीने सुरू करण्याबाबत निर्देश देण्यात आले.

याशिवाय,जलतारा प्रकल्पांतर्गत नाम फाऊंडेशन तसेच इतर स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून “प्रति एकर एक जलतारा” हा उपक्रम जिल्ह्यात पथदर्शी स्वरूपात राबविण्याचे ठरविण्यात आले. या प्रकल्पासाठी गावनिहाय इच्छुक शेतकऱ्यांच्या याद्या तात्काळ संकलित करून त्या संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांमार्फत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. बैठकीच्या शेवटी जिल्हाधिकारी यांनी सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून ठरविण्यात आलेल्या बाबींची प्रभावी अंमलबजावणी करावी व निश्चित कालमर्यादेत अपेक्षित उद्दिष्टे साध्य करावीत,असे निर्देश दिले. 

 
Top