धाराशिव (प्रतिनिधी)-  एमबीए / एमएमएस सीईटी २०२६ ही परीक्षा सोमवार दि.६ एप्रिल ते बुधवार ८ एप्रिल २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आली असून,या पार्श्वभूमीवर शासकीय तंत्रनिकेतन, धाराशिव या परीक्षा केंद्राच्या परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ लागू करण्यात आले आहे.परीक्षार्थींना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये व परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी यांनी हा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

ही परीक्षा सकाळी ९ ते ११.३० व दुपारी २ ते ४.३० या वेळेत होणार आहे.परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात बाह्य उपद्रव टाळण्यासाठी व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या परिसरात कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यास मनाई करण्यात आली आहे.तसेच शांततेस बाधा निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करण्यास बंदी घालण्यात आली आहे.केंद्राच्या १०० मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर,पानपट्टी, टायपिंग सेंटर,एसटीडी बूथ,इंटरनेट कॅफे,कॉम्प्युटर सेंटर्स आदी सेवा परीक्षा कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

याशिवाय मोबाईल फोन,सेल्युलर फोन,फॅक्स,ईमेल व इतर प्रसार माध्यमे परीक्षा केंद्रात घेऊन जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.कोणत्याही वाहनांना केंद्र परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षेशी संबंधित नसलेल्या व्यक्तींना तसेच परीक्षार्थ्यांच्या नातेवाईकांनाही प्रवेश नसेल.परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.केवळ परीक्षेशी संबंधित अधिकारी, कर्मचारी,शासकीय अधिकारी, शिक्षक व परीक्षार्थी यांनाच केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे.

हे आदेश दि.६ एप्रिल ते ८ एप्रिल २०२६ या कालावधीत सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत लागू राहतील.आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहिता कलम २२३ नुसार गुन्हा नोंदवून फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top