लातूर (प्रतिनिधी) - गाहकाभिमूख सेवा देण्यासाठी महावितरण सातत्याने विविध प्रयत्न करत असते. त्याच सुविधेचा भाग म्हणून वीजग्राहकांना अनेक सेवा घरबसल्या देण्यास महावितरणने सुरुवात केलेली आहे. सर्व प्रकारच्या वीजसेवांची माहिती ग्राहकांच्या मोबाइलवर एसएमएसद्वारे दिली जाते. वीजबिल तसेच वीजपुरवठा बंदचा कालावधी व इतर माहिती मिळवण्यासाठी लातूर परिमंडलातील १२ लाख ९८ हजार ४० वीजग्राहकांनी महावितरणकडे मोबाइल क्रमांक नोंदवला आहे.

लातूर, बीड व धाराशिव या तीन जिल्हयांचा समावेश असलेल्या लातूर  परिमंडलातील कृषीपंप ग्राहकांसह सर्व वर्गवारीतील एकूण १५ लाख २ हजार ९६२ वीजग्राहकांपैकी १२ लाख ९८ हजार ४० वीजग्राहकांनी महावितरणकडे मोबाइल क्रमांक नोंदवला आहे. यात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर या वर्गवारीतील १० लाख ६ हजार ३९३ ग्राहकांपैकी ९ लाख ३४ हजार ९८ ग्राहकांचा अर्थात ९२.८१ टक्के ग्राहकांचा समावेश आहे. तर कृषिपंप वर्गवारीतील ४ लाख ९६ हजार ५६९ ग्राहकांपैकी ३ लाख ६३ हजार ९४२ ग्राहकांचा अर्थात ७३.२९ टक्के ग्राहकांचा समावेश आहे. लातूर मंडलात सर्व वर्गवारीतील ५ लाख ९६ हजार २१८ वीजग्राहकांपैकी ५ लाख ३५ हजार ३८० ग्राहकांनी, बीड मंडलात ४ लाख ७६ हजार ५७३ वीजग्राहकांपैकी ४ लाख ९ हजार ९ ग्राहकांनी, तर धाराशिव मंडलात ४ लाख ३० हजार १७१ वीजग्राहकांपैकी ३ लाख ५३ हजार ६५१ वीजग्राहकांनी महावितरणकडे मोबाइल क्रमांक नोंदवला आहे.

या ग्राहकांना वीजबिलाची माहिती, तांत्रिक बिघाड किंवा नियोजित देखभाल व दुरुस्तीमुळे वीजवाहिनीवरील बंद असलेला वीजपुरवठा पूर्ववत होण्याचा कालावधी, मीटर रीडिंग, बिल भरण्याची अंतिम तारीख, बिल प्राप्त झाल्याचा संदेश यासह विविध वीजसेवांची माहिती 'एसएमएस'द्वारे पाठवण्यात येते. परिमंडलातील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, कृषी व इतर अशा सर्व वर्गवारीतील ८६.३७ टक्के ग्राहकांच्या मोबाइल क्रमांकांची नोंदणी झालेली आहे. असे असले तरीही ज्या ग्राहकांना आपला मोबाइल क्रमांक नोंदवायचा आहे अथवा बदलायचा आहे, त्यांनी १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ व १८००-२३३-३४३५ या २४ तास सुरू असणाऱ्या टोल फ्री क्रमांकांवर किंवा महावितरणच्या https://pro.mahadiscom.in/ConsumerInfo/consumer.jsp या संकेतस्थळावर किंवा महावितरण अॅपवर नोंदणी करावी, असे आवाहन मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांनी केले आहे.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top