धाराशिव (प्रतिनिधी) - काँग्रेसच्यावतीने सर्वसामान्य जनतेमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मिसळून त्यांच्या अडीअडचणी समजून घेता याव्यात यासाठी संघटन सृजन अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते प्रत्येक बुथ स्तरावर जाणार असून जनतेच्या समस्या काय आहेत ? ते समजून घेण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रत्येक वाडी वस्ती आणि गाव तांडा या ठिकाणी पोचणार आहेत. त्या समस्या सोडविण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करतील. काँग्रेसचे जाळे सर्व स्तरावर मजबूत आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न घेवून कॉग्रेस सघर्ष करीत आहेत असे मत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेश प्रभारी तथा धाराशिव प्रभारी राजेश तिवारी यांनी व्यक्त केले. 

धाराशिव शहरातील काँग्रेस भवनमध्ये काँग्रेसचे संघटन सृजन अभियान संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत राजेश तिवारी बोलत होते. पुढे बोलताना म्हणाले की, भाजपने ईडी, सीबीआय व एसआयआर आदींची भीती दाखवण्यासह लालच दाखवून तसेच जाती धर्माच्या नावावर भारतीय जनता पार्टी सत्ता स्थापन करत आहे. मात्र जनता काँग्रेस सोबत असून आगामी काळात जनताच केंद्रातील मोदी सरकारला मुळासकट उखडून फेकणार असल्याचे सांगून भाजपवर हल्लाबोल केला. पुढे बोलताना तिवारी म्हणाले की, काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा देशभर केली. ही यात्रा 6 हजार किलो मीटरपेक्षा जास्त करण्यात आली असून या माध्यमातून खासदार गांधी यांनी सर्वसामान्यांच्या अडचणी जवळून समजून घेतल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी काँग्रेस पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज पाटील, महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा धाराशिव निरिक्षक हेमंत ओगले, प्रदेश महासचिव तथा धाराशिव निरीक्षक डॉ.श्रावण रॅपनवाड, प्रदेश सचिव उदयसिंग पाटील, प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार, ज्येष्ठ नेते विश्वास शिंदे, राजाभाऊ शेरखाने, डॉ. स्मिता शहापूरकर, खलील सय्यद, पांडुरंग कुंभार, विनोद वीर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. 

 जनतेशी चर्चा करून जिल्हाध्यक्ष ठरवणार

ज्या जिल्हाध्यक्षांचे काम जनतेशी जोडलेले असेल आणि जनतेने त्यांच्या कामावर पसंती दिली तर त्यांना पुन्हा जिल्हाध्यक्ष पदाची संधी देणार असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. सध्या पक्षाची पुनर्बांधणी करण्याचे काम सुरू असून या बांधणीमध्ये अशा अनुभवी जिल्हाध्यक्षाचा पक्षाच्या वाढीसाठी मोठी मदत होणार असल्याचे नमूद करीत ते म्हणाले की, 19 एप्रिला यासंदर्भात थेट जनसेशी संवाद करून निर्णय घेतला जाणार असल्याचे तिवारी यांनी सांगितले.


 
Top