धाराशिव (प्रतिनिधी)-  वीरशैव जंगम मठ ट्रस्टच्या कार्यकारिणीची बैठक नुकतीच उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. या बैठकीत ट्रस्टच्या नव्या पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी गिरीश पाळणे तर उपाध्यक्षपदी ॲड शिवयोगी चपने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

यावेळी मठाचे विद्यमान अध्यक्ष शिवानंद रामहरी कथले यांनी प्रकृती व वैयक्तिक कारणास्तव अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी कार्यकारिणीने एकमताने नवीन पदाधिकाऱ्यांची निवड केली. निवडीनंतर उपस्थित समाज बांधवांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी नवनियुक्त अध्यक्ष गिरीश पाळणे यांनी आपले धोरण स्पष्ट करताना सांगितले की, “मठाचे कार्य पूर्णपणे पारदर्शक, सर्वसमावेशक व समाजाभिमुख ठेवण्यात येईल. कोणत्याही प्रकारची गटबाजी किंवा भेदभाव न करता सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन कार्य केले जाईल.” तसेच त्यांनी पुढे नमूद केले की,

 “धाराशिव येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक उन्नतीसाठी नियोजनबद्ध उपक्रम राबवले जातील. समाजातील युवकांना प्रोत्साहन देऊन समाजातील एकजूट अधिक बळकट करण्यावर विशेष भर दिला जाईल.” उपाध्यक्ष ॲड. शिवयोगी चपने यांनीही सर्वांच्या सहकार्याने मठाचे कार्य अधिक गतिमान, प्रभावी व सर्वसमावेशक करण्याचा निर्धार व्यक्त केला. यानंतर सचिव श्रीकांत गणपतप्पा साखरे, कोषाध्यक्ष वैजिनाथ शिवप्पा गुळवे, तसेच डॉ. अनंत राजमाने व इतर सदस्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच समाजातील सर्व स्तरातून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. 

 
Top