कळंब (प्रतिनिधी)- येथील प्रियदर्शनी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि . ने 31 मार्च 2026 अखेर आर्थिक प्रगतीचा नवा टप्पा गाठत बँकेची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत आणि समाधानकारक असल्याचे स्पष्ट केले आहे. चालू आर्थिक वर्षात बँकेने आर्थिक स्थैर्यासोबतच विश्वासार्हतेतही उल्लेखनीय वाढ नोंदवली असून व्यवस्थापनाची दूरदृष्टी, काटेकोर नियोजन, पारदर्शक कारभार आणि सर्व घटकांच्या सक्रिय सहभागामुळे हे यश साध्य झाल्याचे बँक प्रशासनाने सांगितले.

यंदाच्या आर्थिक वर्षातील सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे बँकेने थकबाकी कर्ज अर्थात एन.पी.ए. पूर्णपणे शून्य टक्क्यांवर राखण्यात यश मिळवले आहे. सहकारी बँकिंग क्षेत्रात एनपीए शून्यावर ठेवणे ही अत्यंत कठीण बाब मानली जाते; मात्र प्रभावी कर्जवाटप धोरण, वेळोवेळी राबवलेल्या वसुली मोहिमा आणि कर्जदारांचा सकारात्मक प्रतिसाद यामुळे बँकेने हे यश संपादन केले. बँकेच्या आर्थिक पत्रकानुसार ठेवी, कर्जवाटप, नफा आणि कार्यकारी भांडवल या सर्वच घटकांत लक्षणीय वाढ झाली आहे. आर्थिक शिस्त आणि नियोजनबद्ध व्यवस्थापनामुळे बँकेची विश्वासार्हता अधिक बळकट झाली असून ग्राहकांचा प्रतिसादही वाढला आहे.

बँकेने आर्थिक व्यवहारांपुरते मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकीही प्रभावीपणे जपली आहे. शेतकरी, लघुउद्योग, गरजू घटक यांना आर्थिक सहाय्य देतानाच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवत “आर्थिक हितासोबत सामाजिक हित जपणारी बँक” अशी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

या यशामागे ठेवीदार, सभासद, ग्राहक, हितचिंतक आणि कर्जदार यांचे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरल्याचे चेअरमन श्रीधर भवर यांनी नमूद केले. प्रत्येक घटकाने बँकेला स्वतःची संस्था मानून दिलेल्या विश्वासामुळेच बँक अधिक सक्षम बनली असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यातही बँक अधिक आधुनिक सेवा, नव्या संधी आणि विश्वासार्ह आर्थिक व्यवहारांच्या माध्यमातून प्रगतीचा वेग कायम ठेवणार असल्याचा विश्वास बँक प्रशासनाने व्यक्त केला आहे.

 
Top