धाराशिव (प्रतिनिधी)- सामाजिक न्याय,आर्थिक व सामाजिक संरक्षण उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. त्यानुसार अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती व वंचित दुर्बल घटकातील व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी तसेच जनजागृती व्हावी या उद्देशाने दरवर्षी 8 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे.

याच अनुषंगाने सामाजिक समता सप्ताहानिमित्त 14 एप्रिल 2026 रोजी सामाजिक न्याय भवन,धाराशिव येथे “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून सामाजिक समता सप्ताह समारोप कार्यक्रम”आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार  होते.प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवदा महाडदळकर,जिल्हा पोलीस अधीक्षक रितु खोखर व जिल्हा परिषदेचे समाज कल्याण समिती सभापती विश्वास कोकणे उपस्थित होते.सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले.प्रास्ताविक समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांनी केले.

या कार्यक्रमात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 अंतर्गत दाखल प्रकरणातील पीडित वारस रोहन बागुल यास शासकीय नोकरीचे नियुक्ती आदेश देण्यात आले.तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत संदीप पाटील यांची सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण पदासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

शासकीय वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विविध स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून शासनाच्या विविध विभागातील पदांवर निवड झाल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला.कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,तेर येथील विद्यार्थिनी अनुश्री मदने हिने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर भाषण केले.तसेच रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्या रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पाण्याचे जार भेटवस्तू म्हणून प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाचे व्याख्याते प्रा.रवी सुरवसे, छत्रपती शिवाजी कॉलेज,धाराशिव यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक,शैक्षणिक,आर्थिक व कृषीविषयक विचारांवर मार्गदर्शन केले. यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना,परदेश शिक्षण  योजनाच्या लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले.तसेच जात वैधता प्रमाणपत्रांचेही वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी समाज कल्याण अधिकारी सनम लोमकणे यांनी आभार मानले.सामाजिक समता सप्ताह कार्यक्रमाचा समारोप उत्साहात संपन्न झाला असून या कार्यक्रमास कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

 
Top