धाराशिव (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज पुतळ्यास अभिवादन करून अन्नदान कार्यक्रम घेण्यात आला.सामाजिक न्याय, आर्थिक व सामाजिक संरक्षण उपलब्ध करून देण्याबाबत राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. त्यानुषंगाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व वंचित दुर्बल घटकातील व्यक्तींच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.या सर्व कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी. तसेच जनतेत जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने दरवर्षी 8 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह हा कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती ही केवळ स्मरणदिन नसून सामाजिक समता,न्याय,बंधुत्व आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाज या परिवर्तनाचा संदेश देणारा प्रेरणादायी दिवस आहे.त्यांनी दिलेल्या संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला समान हक्क मिळाले असून त्यांच्या विचारांची आजही समाजाला दिशा देणारी प्रेरणा मिळते.
त्यानुसार 14 एप्रिल रोजी “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव शहरातील “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच या ठिकाणी समाज कल्याण कार्यालयाकडून अन्नदान स्वरूपात मसाले भात व जिलबीचे वाटप करण्यात आले.अन्नदान स्टॉलचे उद्घाटन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदाळकर,जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर व जिल्हा परिषदेचे समाज कल्याण समिती सभापती विश्वास कोकणे यांच्या हस्ते करण्यात आले.
या अन्नदान वाटप कार्यक्रमास समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले,समाज कल्याण अधिकारी सनम लामकाने तसेच कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमामुळे समाजात एकोपा,समता आणि सेवाभावाची भावना अधिक दृढ होत असून, त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचा संदेश यामधून देण्यात आला.

