धाराशिव (प्रतिनिधी)- सध्या एसटी बसस्थानकांमध्ये एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) काढण्याची प्रक्रिया सुरू असताना,नागरिकांमध्ये विविध अफवा पसरवल्या जात असल्याचे समोर आले आहे.विशेषतः एनसीएमसी कार्ड नसल्यास एसटीच्या विविध सवलती बंद होतील किंवा प्रवाशांना सवलतीचा लाभ मिळणार नाही,अशी चुकीची माहिती प्रसारित होत असल्याने प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.मात्र,या सर्व अफवा पूर्णपणे निराधार असल्याचे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या धाराशिव विभागीय कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
विभाग नियंत्रक अजय पाटील यांनी सांगितले की, एनसीएमसी कार्ड सध्या अनिवार्य नसून,कार्ड नसले तरीही प्रवाशांना पूर्वीप्रमाणे सर्व सवलती मिळत राहणार आहेत. त्यामुळे कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये,असे त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. एसटी महामंडळाच्या विविध सवलत योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांकडे वैध ओळखपत्र असणे आवश्यक आहे.आधार कार्ड, मतदान ओळखपत्र यांसारख्या कागदपत्रांच्या आधारे नागरिकांना अमृत ज्येष्ठ नागरिक योजना,ज्येष्ठ नागरिक सवलत,महिला सन्मान योजना यांसह इतर योजनांचा लाभ मिळत राहील,असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
एनसीएमसी कार्ड काढण्याची प्रक्रिया ही प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आली असून, भविष्यात डिजिटल व्यवहार अधिक सुलभ व्हावेत,बस प्रवास अधिक सुसूत्र व्हावा आणि एकाच कार्डवर विविध सुविधा उपलब्ध व्हाव्यात हा या उपक्रमामागील उद्देश आहे.मात्र, यामुळे सध्या सुरू असलेल्या सवलती बंद होतील,असा कोणताही अर्थ नाही,असेही स्पष्ट करण्यात आले आहे.गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि स्थानिक स्तरावर पसरत असलेल्या चुकीच्या संदेशांमुळे अनेक नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण झाला होता.या पार्श्वभूमीवर धाराशिव विभागीय कार्यालयाने अधिकृत स्पष्टीकरण देत अफवांवर विश्वास ठेवू नका आणि केवळ अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्या,असे स्पष्ट केले आहे.
दरम्यान,जिल्ह्यात सध्या 117 नोंदणीकृत केंद्रे कार्यरत असून नागरिकांना येथे एनसीएमसी नोंदणी करता येत आहे.ही प्रक्रिया तत्काळ बंद होणार नसून,सर्व पात्र नागरिकांची नोंदणी पूर्ण होईपर्यंत केंद्रे सुरू राहणार आहेत.त्यामुळे कोणत्याही एका केंद्रावर गर्दी करून गोंधळ निर्माण करू नये,असे प्रशासनाने सांगितले आहे.आगामी काळात केंद्रांची संख्या वाढविण्याचा विचारही सुरू असून नागरिकांनी संयम बाळगावा,असे आवाहन करण्यात आले आहे. महामंडळाकडून ही सेवा शेवटच्या घटकातील प्रवाशांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.ज्येष्ठ नागरिक,दिव्यांग तसेच विविध योजनांचे लाभार्थी यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.तसेच,नोंदणी करताना केवळ निश्चित शुल्कच भरावे आणि कोणालाही अतिरिक्त रक्कम देऊ नये.कोणी अतिरिक्त पैसे मागितल्यास तात्काळ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ,धाराशिव विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहन विभाग नियंत्रक अजय पाटील यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणतीही माहिती मिळाल्यास तिची खातरजमा करूनच विश्वास ठेवावा. अफवांमुळे निर्माण होणारा संभ्रम टाळण्यासाठी अधिकृत कार्यालयाशी संपर्क साधावा.एनसीएमसी कार्ड नसले तरी एसटीच्या सर्व सवलती पूर्ववत सुरू राहणार असल्याने प्रवाशांनी निश्चिंत राहावे,असे विभाग नियंत्रक कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
