धाराशिव (प्रतिनिधी)-   एमएचटी-सीईटी 2026 ही परीक्षा दि.11 एप्रिल ते 20 एप्रिल 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आली असून, परीक्षेच्या पार्श्वभूमीवर शासकीय तंत्रनिकेतन,धाराशिव तसेच तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट अभियांत्रिकी महाविद्यालय,सोलापूर रोड, धाराशिव या परीक्षा केंद्रांच्या परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू करण्यात आले आहे.परीक्षार्थींना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये व परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी यांनी हा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

ही परीक्षा दररोज सकाळी 7.30 ते दुपारी 12 व दुपारी 12.30 ते सायंकाळी 6.45 या वेळेत होणार आहे.परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात बाह्य उपद्रव टाळण्यासाठी व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आदेशानुसार,परीक्षा केंद्राच्या परिसरात कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यास मनाई करण्यात आली आहे.तसेच शांततेस बाधा निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करण्यास बंदी घालण्यात आली आहे.केंद्राच्या 100 मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर,पानपट्टी, टायपिंग सेंटर, एसटीडी बूथ, इंटरनेट कॅफे, कॉम्प्युटर सेंटर्स आदी सेवा परीक्षा कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

याशिवाय, मोबाईल फोन, सेल्युलर फोन,फॅक्स, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे परीक्षा केंद्रात घेऊन जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.कोणत्याही वाहनांना केंद्र परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षेशी संबंधित नसलेल्या व्यक्तींना तसेच परीक्षार्थ्यांच्या नातेवाईकांनाही प्रवेश नसेल. तसेच परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. केवळ परीक्षेशी संबंधित अधिकारी, कर्मचारी, शासकीय अधिकारी, शिक्षक व परीक्षार्थी यांनाच केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. हे आदेश दि.11 ते 20 एप्रिल 2026 या कालावधीत दररोज सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत लागू राहतील.आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहिता कलम 223 नुसार गुन्हा नोंदवून फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

 
Top