तुळजापूर (प्रतिनिधी)- ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सन 2024-25 व 2025-26 या हंगामातील थकीत ऊस बिल मिळाले नसल्याने शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी शेतकरी संघटनांना चर्चेसाठी बोलावले आहे.
शेतकरी संघटनांच्या वतीने साखर आयुक्त कार्यालयात दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून जोपर्यंत ऊस बिल मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने दखल घेत शेतकरी प्रतिनिधींना चर्चेसाठी निमंत्रित केले आहे. मात्र संबंधित दिवशी साखर आयुक्त मंत्रालयातील बैठकीत व्यस्त असल्याने प्रत्यक्ष चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे आता बुधवार, दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी शेतकरी संघटनांच्या 3 ते 4 प्रतिनिधींनी उपस्थित राहून आपल्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. या बैठकीत थकीत ऊस बिलाच्या प्रश्नावर तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, शेतकऱ्यांचे लक्ष या चर्चेकडे लागले आहे. दरम्यान, वेळेत बिल न मिळाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही शेतकरी संघटनांकडून देण्यात आला आहे.