तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आरोग्य सुविधा अधिक सुलभ व्हाव्यात यासाठी नगरपरिषदेकडून पुढाकार घेतला जात आहे. नगर परिषद तुळजापूर अंतर्गत गटनेते श्री. ओंदुवर पंडितराव कदम यांनी उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे नवीन दवाखाना मंजूर करण्याची मागणी केली आहे.

दि. 9 एप्रिल 2026 रोजी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात संत सेवालय नगर, विश्वास नगर, हडको कॉलनी, छत्रपती शिवाजी नगर, आनंद नगर, अयोध्या नगर, वंदे मातरम नगर, अपसिंगा रोड व कणे प्लॉटिंग या परिसरातील नागरिकांना सध्या आरोग्य सेवांसाठी 3 ते 4 किमी अंतर पार करावे लागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नगरपरिषद मालकीची सुमारे 2000 चौरस फुटांची इमारत उपलब्ध असून त्या ठिकाणी दवाखाना सुरू केल्यास आसपासच्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. नागरिकांच्या सोयीसाठी मध्यवर्ती ठिकाणी ही सुविधा सुरू करण्याची विनंती निवेदनातून करण्यात आली आहे.

तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर दवाखाना मंजूर करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, शहरातील आरोग्य सुविधा वाढविण्यासाठी हा प्रस्ताव महत्त्वाचा मानला जात असून नागरिकांकडूनही याला पाठिंबा मिळत आहे.

 
Top