तुळजापूर (प्रतिनिधी)-  तुळजापूर तालुक्यातील जळकोट परिसरात कोल्ह्यांनी केलेल्या हल्ल्यात 75 ते 80 शेळ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी दि. 27 एप्रिल रोजी दुपारी सुमारे चार वाजता जळकोट शिवारातीलच आष्टाकासार शिवारात ही घटना घडली. या घटनेमुळे मेंढपाळ व्यावसायिकांमध्ये भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळकोट येथील तीन मेंढपाळांच्या सुमारे 300 शेळ्या आहेत. त्या सोमवारी आष्टा कासार शिवरात शेतकऱ्यांच्या शेतात बसवण्यासाठी   आष्टाकासार शिवारात नेण्यात आल्या होत्या. यावेळी लहान पिल्ले कंपाउंडमध्ये ठेवून मेंढपाळ इतर शेळ्या चारण्यासाठी शेतात गेले होते. परिसर निर्जन असल्याची संधी साधत कोल्ह्यांनी थेट कंपाउंडमध्ये घुसून पिल्लांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात सोमवारी सुमारे 70 शेळ्या मृत्युमुखी पडल्या. तर मंगळवारी सकाळी आणखी 3 शेळ्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृतांची संख्या 75 ते 80 दरम्यान पोहोचली आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सहकाऱ्यांना घटनास्थळी पाठवून मेंढपाळांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी वनविभाग अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले तसेच नुकसानग्रस्त मेंढपाळांना शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी गणेश सोनटक्के, अशोक पाटील, प्रकाश चव्हाण, आशिष सोनटक्के, वन अधिकारी कोकाटे आदींनी भेटी दिल्या. या घटनेमुळे परिसरातील मेंढपाळांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत असून वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांपासून संरक्षणासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

 
Top