भूम (प्रतिनिधी)- सध्या जानवत असलेल्या गॅस टंचाईमुळे हॉटेल व्यवसायावर मोठे संकट ओढवले असताना भूम येथील निर्मल खवा उद्योग यांनी पर्यायी ऊर्जेचा प्रभावी वापर करत विकसित केलेल्या इंडक्शन तंत्रज्ञानामुळे हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळत आहे. या उपक्रमामागे विनोद जोगदंड यांचा दूरदृष्टीपूर्ण पुढाकार महत्त्वाचा ठरला आहे.
सध्या गॅस सिलिंडरचा अपुरा व अनियमित पुरवठा, सतत वाढणारे दर, अचानक संपणारा गॅस आणि वेळेवर उपलब्धता न होणे या कारणांमुळे हॉटेल चालकांना रोजच्या स्वयंपाकाचे नियोजन करणे कठीण झाले आहे. अनेक ठिकाणी ग्राहकांची वाढती गर्दी असतानाही स्वयंपाक थांबवावा लागणे, ऑर्डर उशिरा पूर्ण होणे, अतिरिक्त खर्च वाढणे आणि ग्राहक नाराजी यांसारख्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे व्यवसायावर थेट परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर विनोद जोगदंड यांनी लाईटवर चालणारी अत्याधुनिक इंडक्शन मशीन तयार करून हॉटेल उद्योगाला पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या मशीनच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात चपाती, भाजी, वरण, भात तसेच चहा यांसारखे पदार्थ जलद आणि सातत्याने तयार करता येत आहेत. त्यामुळे गॅस व डिझेलचा वापर मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. विशेष म्हणजे या तंत्रज्ञानामुळे गॅसच्या तुलनेत सुमारे 60 टक्के खर्चाची बचत होत असल्याचे समोर आले असून वाढत्या इंधन खर्चाच्या पार्श्वभूमीवर ही बाब अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.
