धाराशिव (प्रतिनिधी)- खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी गाठण्यासाठी केवळ सराव पुरेसा नसून नियमित स्पर्धांमध्ये सहभागी होणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत कांचनमाला संगवे यांनी व्यक्त केले.
भारतीय जैन संघटनेच्या वतीने धाराशिव येथील तुळजाभवानी क्रीडा संकुलात आयोजित जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात भारतीय जैन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य कांचन माला सांगवी बोलत होत्या. यावेळी क्रीडा भारतीचे ज्येष्ठ मार्गदर्शक राजाभाऊ वैद्य, भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयकुमार जैन, धाराशिव तालुका अध्यक्ष प्रवीण गडदे, रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य संदीप देशमुख, स्केटिंग प्रशिक्षक यशस्वी कदम, तसेच राष्ट्रीय खेळाडू अभिजीत कंदले आणि अजिंक्य जाधव यांच्यासह खेळाडू व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विविध गटांमध्ये रंगलेल्या या स्पर्धांमध्ये खेळाडूंनी आपली गती, कौशल्य आणि आत्मविश्वासाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. विजेत्या खेळाडूंना पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, तर सर्व सहभागी खेळाडूंनाही प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामुळे तुळजाभवानी क्रीडा संकुलात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. खेळाडू, पालक आणि क्रीडाप्रेमींच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम अधिक रंगतदार झाला.
