भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील चिंचपूर ढगे येथील शेतकरी अभिमान ढगे (वय 60) यांच्यावर गावातील तिघांनी मिळून भीषण खुनी हल्ला केल्याची घटना 8 एप्रिल रोजी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. शेतातून घरी परतत असताना त्यांना अडवून हा हल्ला करण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिमान ढगे हे शेतातून घरी येत असताना आरोपींनी त्यांना अडवून गज व दगडांनी बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला. अभिमान ढगे यांना मुलगा नसल्याने त्यांनी तिंघा आरोपींना जमिन न विकल्याने ती जमिन भूम येथील एका व्यक्तिला विकल्याच्या कारणावरून हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, हल्ल्यावेळी ढगे यांच्या पत्नी वृदावंनी ढगे यांनी प्रसंगावधान राखत पतीच्या अंगावर झेप घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र या हल्ल्यात अभिमान ढगे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून ते चार दिवस बेशुद्ध अवस्थेत होते.
घटनेनंतर जखमी ढगे यांना प्रथम वालवड येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांना दाखल करून घेण्यात आले नसल्याची माहिती आहे. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी भूम येथील ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले परंतु जबर मारहाणीमुळे बेशुद्ध असल्यामुळे त्यांना जगदाळे मामा हॉस्पिटल येथे हलविण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून संबंधित आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणीही जोर धरत आहे.
