धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमुळे महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत असून,बचतगटांच्या माध्यमातून त्यांना आर्थिक स्वावलंबनाची नवी दिशा मिळत आहे.
जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन “मिनी सरस” चे आयोजन लेडीज क्लब मैदान, धाराशिव येथे दिनांक 24 ते 28 फेब्रुवारी 2026 या कालावधीत करण्यात आले होते.या प्रदर्शनात स्वयं सहायता समूहातील महिला भगिनींनी उत्पादित केलेल्या दर्जेदार उत्पादनांची व खाद्यपदार्थांची विक्री करण्यासाठी सुसज्ज अशा 100 स्टॉल्सची उभारणी करण्यात आली होती.प्रदर्शनादरम्यान धाराशिवकरांसाठी वेगळा फूड कोर्ट उभारण्यात आला होता,ज्यामध्ये ग्रामीण बाज असलेल्या रुचकर व चविष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद नागरिकांनी घेतला.
जिल्ह्यात एकूण 15 हजार 380 स्वयं सहायता समूहांची स्थापना करण्यात आली असून सुमारे दीड लाख कुटुंबे या अभियानाशी जोडली गेली आहेत.यासोबतच 803 ग्रामसंघ,55 प्रभागसंघ, 521 महिला उत्पादक गट आणि महिलांच्या 11 शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यात आली आहे. या सर्व उपक्रमांमुळे महिलांना केवळ आर्थिक आधारच मिळाला नसून त्यांचा आत्मविश्वासही मोठ्या प्रमाणात वाढला आहे.‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात सुमारे 99 हजार 276 महिला “लखपती दीदी” बनल्या आहेत.
बचतगटांमुळे महिलांना नियमित बचत, कर्ज सुविधा,लघुउद्योग उभारणी आणि कौशल्य विकासाच्या संधी मिळाल्याने त्यांच्या जीवनमानात आमूलाग्र बदल झाला आहे.पूर्वी घरगुती जबाबदाऱ्यांपुरत्या मर्यादित असलेल्या महिला आता व्यवसाय,विपणन आणि निर्णय प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेत आहेत.
दरम्यान,जिल्हा नियोजन समिती अंतर्गत टुरिस्ट बस प्रकल्प राबविण्यात येत असून यासाठी 76 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.या निधीतून दोन 17 सीटर एसी अर्बनिया बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत.हा प्रकल्प जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरील पर्यटन विकासाला चालना देणारा ठरणार असून ग्रामीण महिलांसाठी उपजीविकेचे विविध स्रोत उपलब्ध करून देणार आहे.
हा प्रकल्प तुळजापूर केंद्रित असून,येथे येणाऱ्या भाविकांना जिल्ह्यातील इतर पर्यटन व ऐतिहासिक स्थळांची माहिती मिळावी यासाठी विशेष टुरिस्ट पॅकेज तयार करण्यात आले आहे. तुळजापूर -नळदुर्ग-अक्कलकोट - पंढरपूर आणि तुळजापूर -तेर -येरमाळा - सरमकुंडी- सोनारी-परंडा असे दोन मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
