धाराशिव (प्रतिनिधी)- तेर येथील संतश्रेष्ठ गोरोबा काका यांच्या समाधी मंदिरातील ओव्हरीच्या कामांसाठी 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे केवळ मंदिराचे सौंदर्य तर खुलणार आहेच त्यासोबत दरवर्षी दर्शनासाठी येणारे लाखो वारकरी आणि भाविक यांच्यासाठी मूलभूत सोयीसुविधाही उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
आपल्या महायुती सरकारने मंजूर केलेल्या 3 कोटी रुपयांच्या निधीतून प्रामुख्याने मंदिराच्या मूळ रचनेला साजेशी विकासकामे केली जाणार आहेत. प्राधान्याने मंदिरातील ओव्हरीचे बांधकाम पूर्ण केले जाणार आहे. मंदिराच्या पूर्व बाजूस 2 कोटी रुपये खर्चून ओव्हरीचे बांधकाम केले जाणार आहे. वारी किंवा उत्सवाच्या काळात भाविकांच्या विश्रांतीसाठी आणि भजनासाठी ही जागा हक्काचे केंद्र ठरणार आहे. ओव्हरीसोबतच ऐतिहासिक वारशाचे जतन जसे की नगारखाना व स्टोन क्लेडिंगचेही काम हाती घेण्यात येणार आहे. नगारखान्याचे बांधकाम आणि मंदिराला स्टोन क्लेडिंग अर्थात दगडी आच्छादन केल्यामुळे मंदिराला प्राचीन आणि भव्य स्वरूप प्राप्त होणार आहे. या कामासाठी स्वतंत्रपणे 1 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे आहे.
आंतरराष्ट्रीय वस्तुसंग्रहालय
येथील कोट टेकडीवर उत्खननाची जिवंत प्रात्यक्षिक प्रयोगशाळा विकसीत केली जाणार आहे. यासाठी 13 कोटी 38 लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच प्राचिन तीर्थकुंड विकासासाठी 5 कोटी 11 लाख, बौद्ध स्तूप विकासासाठी 2 कोटी 21 लाख रूपयांचा निधी उपलब्ध आहे. आता समाधी मंदिराच्या कामासाठी 3 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. कै. रामलिंगप्पा लामतुरे शासकीय वस्तू संग्रहालय जवळपास 24 हजार 766 पुरातन अवशेषाचा संग्रह उपलब्ध आहे. या संग्रहालयाच्या नवीन इमारतीचे बांधकामही सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुरातन वस्तू संग्रहालय आता या नवीन इमारतीच्या माध्यमातून अनुभवता येणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.
