तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजाभवानी मंदिर शहरातील धाराशिव रोडवरून जाणारी केव्ही वीज लाईन सध्या नागरिकांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. झाडांच्या वाढलेल्या फांद्या थेट वीज तारेांना लागल्याने वारंवार स्पार्किंग आणि आगीच्या घटना घडत असल्याचे समोर आले आहे.
दोन ठिकाणी सतत स्पार्किंग; आग लागण्याच्या घटना
शहरातील अतिवर्दळीच्या धाराशिव रोडवरून जाणाऱ्या या केव्ही लाईनच्या दोन ठिकाणी झाडांच्या फांद्या तारांना चिकटत असल्याने स्पार्किंग होत आहे.
रविवारी सायंकाळी झालेल्या पावसात तर स्पार्किंगमुळे झाडांना आग लागल्याचे प्रकार घडले, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
पावसात वाढतो धोका; करंट खाली उतरण्याची शक्यता
पावसाळी वातावरणात अशा स्पार्किंगमुळे करंट जमिनीकडे उतरण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. या प्रकारांमुळे संबंधित भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
झाडांची छाटणी न केल्याने प्रश्न गंभीर!
सदर केव्ही लाईनखालील झाडांची वेळेवर छाटणी किंवा तोडणी न केल्याने ही समस्या निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. महावितरण कडून आवश्यक देखभाल न केल्यानेच हा प्रकार घडत असल्याचा आरोप होत आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही योग्य ती कारवाई न झाल्याने नाराजी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून खालील मागण्या जोर धरत आहेत केव्ही लाईनखालील झाडांची तात्काळ छाटणी/तोडणी करावी. धोकादायक ठिकाणी सुरक्षा उपाययोजना कराव्यात. संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी. एकूणच, तुळजापूरसारख्या वर्दळीच्या शहरात अशा प्रकारे वीज लाईन धोकादायक बनणे ही गंभीर बाब ठरत आहे. कोणतीही दुर्घटना होण्यापूर्वीच प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे.
