मुरुम ​( प्रतिनिधी)- माणसाने माणसाला जोडणे हीच काळाची गरज आहे. द्वेषाच्या आगीत होरपळणाऱ्या जगाला प्रेमाची फुंकर घालण्यासाठी मानवतावादी दृष्टिकोन अंगीकारणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन बार्शी येथील विक्रम क्षीरसागर यांनी केले.

​सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या आशीर्वादाने, संत निरंकारी मंडळाच्या वतीने शुक्रवार, २४ एप्रिल रोजी मुरूम येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या सभागृहात मानव एकता दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी क्षीरसागर मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

​बलिदानाचा इतिहास आणि मानवतेचा संदेश

​आपल्या ओघवत्या शैलीत मार्गदर्शन करताना क्षीरसागर म्हणाले की, २४ एप्रिल १९८० रोजी बाबा गुरबचनसिंहजी महाराज यांनी मानवतेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्यासोबतच भक्त चाचा प्रतापसिंह आणि भाई बुटासिंह यांचे बलिदान विसरता येणार नाही. हे बलिदान केवळ एका संस्थेसाठी नसून संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी होते. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ जगभरात हा दिवस मानव एकता दिन म्हणून पाळला जातो.

​बाबा हरदेवसिंह महाराजांचे कार्य रक्तदान नव्हे, जीवनदान

​सद्गुरू बाबा हरदेवसिंहजी महाराज यांनी ३६ वर्षे मिशनचे नेतृत्व करताना मानवतेला केंद्रबिंदू मानले. त्यांनी दिलेला रक्त नाड्यांमध्ये वहावे, नाल्यांमध्ये नको, हा संदेश आज जगभर रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरवला जात आहे. आध्यात्मिक जागृतीसोबतच वृक्षारोपण, स्वच्छता अभियान आणि आपत्ती निवारण अशा सामाजिक कार्यात मिशनने जागतिक ठसा उमटवला असल्याचेही त्यांनी नमूद केले.

​सेवादारांसाठी आदर्शाची त्रिसूत्री ​सांगताना ​अहंकाराचा त्याग, मी पणा सोडून तू (ईश्वर) चा स्वीकार करणे. बाबाजींनी  दिलेले पाच प्रण केवळ बोलण्यासाठी नसून ते प्रत्यक्ष जगण्यासाठी आहेत. सेवा, सिमरण आणि सत्संग या त्रिसूत्रीचा अवलंब करून जीवनात नम्रता आणणे.

​या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश समाजातील जाती-धर्म आणि भेद विसरून सर्वांना एका सूत्रात बांधणे हा होता, असे मुरूम ब्रँचचे मुखी दयानंद साखरे यांनी प्रास्ताविकात सांगितले. कार्यक्रमाचे नेटके संचालन मीरा मोटे यांनी केले.

​याप्रसंगी मुरूम व परिसरातील बहुसंख्य सेवादल सदस्य, महात्मा आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. स्थानिक निरंकारी मंडळाच्या सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top