धाराशिव (प्रतिनिधी)- वेतनाचा फरक काढून देण्यासाठी वेतन व भविष्य निर्वाह निधी माध्यमिक शिक्षण विभाग धाराशिव येथील पठाण इम्रानखान अहमदपाशा यास 8 हजार रूपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादीस वेतनमधील फरक काढून देण्यासाठी 10 हजार रूपयांची लाच पठाण यांनी मागितली होती. त्यानंतर या संदर्भातील फिर्याद लाच लुचपत प्रतिबंधक विभाग धाराशिव यांच्याकडे लेखी करण्यात आली. फिर्यादी यांची सन 2016 ते सन 2024 दरम्यानच्या वरिष्ठ वेतन श्रेणीचा वेतनाचा फरक 1 लाख 84 हजार 600 रूपये लवकर काढून देण्यासाठी पठाण याने पैशाची मागणी केली होती. त्यांच्यात तडजोड होवून 10 हजार रूपयांच्या ऐवजी 8 हजार रूपयांची मागणी पठाण यांनी केली. लाच लुचपत प्रतिबंधक पथक धाराशिव यांनी सापळा लावल्यानंतर सेट्रल बिल्डींगमधील अधीक्षक कार्यालय वेतन व भविष्य निर्वाह निधी यांच्या कॅबीनमध्ये पंचासमक्ष 8 हजार रूपये स्विकारताना पठाण यास पथकाने ताब्यात घेतले. या प्रकरणी आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पथकात पोलिस निरीक्षक विजय वगरे व त्यांच्या पथकात पाटील, जाधव, करडे, तावसकर, हजारे यांचा समावेश होता. पुढील तपास पोलिस निरीक्षक बाळासाहेब नरवटे हे करीत आहेत.
