तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरातील लातूर रोडवरील बसस्थानकात मंगळवार (दि. 28) रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हैदराबाद राज्यातील भाविक महिलेच्या गळ्यातील सुमारे तीन तोळे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली. या प्रकारामुळे महिला भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील हल्ला दुर्गम येथील 45 वर्षीय विधवा महिला रामलु मल्लय्या या श्री तुळजाभवानी मंदिर येथे दर्शनासाठी आल्या होत्या. दर्शन आटोपल्यानंतर लातूर रोडवरील बस स्थानकात आल्या त्या हैदराबादकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना अज्ञात इसमाने त्यांच्या गळ्यातील सुमारे तीन तोळे तीन ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र मागुन चोरून नेले. घटनेनंतर महिलेने आरडाओरड केल्याने बस थेट तुळजापूर पोलीस ठाण्यात आणण्यात आली. पोलिसांनी बसमधील प्रवाशांची तपासणी केली, मात्र चोरीचा मुद्देमाल मिळून आला नाही. संबंधित महिला तेलगू भाषिक असल्याने तक्रार नोंदविताना भाषेची अडचणही निर्माण झाली.
संतप्त प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या, “हम तेलंगणा से माँ जगदंबा के पास आए हैं, यहाँ ऐसा कैसे हो सकता है? अगर ऐसा हो गया तो हमारी हमारी सुरक्षा कौन करेगा?” दरम्यान, बसस्थानक व मंदिर परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “सीसीटीव्ही कॅमेरे असताना अशा घटना कशा घडतात?” असा सवालही उपस्थित केला जात आहे. सदरील घटना ज्या बस स्थानकात घडली त्या बस स्थानकातील काही सीसीटीव्ही बंद असल्याचे कळते. बसस्थानक व मंदिर परिसरात कडक पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही यंत्रणा प्रभावीपणे कार्यान्वित करणे, महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना, तुळजापूरमध्ये महिलांच्या दागिन्यांच्या चोरीच्या घटना वाढत असल्याने आता याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असून, राज्याच्या गृहमंत्र्यांनीही याबाबत ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.