धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील तामलवाडी पोलिसांनी मोठी कारवाई करीत 2 आरोपीना 46 ग्राम ड्रग्जसह ताब्यात घेतले. पुणे येथुन काही आरोपी ड्रग्ज तस्करी असल्याची माहिती सोलापूर पोलिसांना समजली. त्यांनी याची माहिती तामलवाडी पोलिसांना दिली. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकुर यांच्या टीमने नाकाबंदी करीत 2 आरोपीना पकडले. या दोन्ही आरोपीना सोलापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असुन पुढील तपास सुरु आहे. यापुर्वी तामलवाडी येथे ड्रग्ज पकडल्यानंतर तुळजापूर येथील मोठे रॅकेट उघड झाले होते.
पुणे येथून एका कारमध्ये ड्रग्स घेऊन काही जण जात असल्याची माहिती सोलापूर पोलिसांना मिळाली. त्यांनी तात्काळ याची माहिती तामलवाडी पोलिसांना दिली. त्यानंतर नाकेबंदी करण्यात आली. पोलिस दिसताच संशयितांनी कारला यु टर्न घेतला व कार तामलवाडी गावात घातली. कारमधील मुख्य आरोपी तोसिफ फरीद सय्यद (कसबा पेठ) हा तामलवाडी येथील राजमुद्रा हॉटेल शेजारी उतरून ज्वारीच्या शेतात पळून गेला.
दुसऱ्या आरोपीने कार पिंपळा गावाकडे वळवली. मात्र, रस्त्यातच कार बंद पडल्याने आरोपी सुफयान शब्बीर फुलारी (रा. पुणे) हा कार तशीच सोडून बाजूच्या शेतात लपून बसला. सपोनि गोकुळ ठाकूर, उमेश माने, गोपाळ सलगर यांनी त्यांचा शोध घेऊन या दोघांनाही पळून जाताना पाठलाग करून पकडले. त्यांच्या कारमधुन 46 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करून त्यांना सोलापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ओढ्यातुन पळून जाणारा आरोपी तौसिफ सय्यद हा तहान लागल्याने तामलवाडी येथील बँकेजवळील पाणपोईजवळ पाणी पिण्यासाठी गेला. तेव्हा पोलिसांनी व्हायरल केलेल्या छायाचित्रातील व्यक्ती हीच असल्याचे पाहून नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस तेथे पोहोचताच त्याने पुन्हा पळ काढला. यावेळी कर्मचारी उमेश माने, गोपाळ सलगर यांनी दोन किमी पाठलाग करून त्याला पकडले. चालक आरोपी सुफयान फुलारी कार बंद पडल्यानंतर लगतच्याच शेतातील एका विहिरीत उतरून कपारीत लपून बसला होता. तामलवाडी पोलिसांनी राबवलेल्या शोध मोहिमेत तो विहिरीत दिसून आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.