धाराशिव (प्रतिनिधी)- मानसिक तणाव, कौटुंबिक वाद आणि सामाजिक अडचणींमुळे अनेकदा व्यक्ती एकटेपणात अडकून पडते.अशा वेळी योग्य मार्गदर्शन आणि भावनिक आधार मिळाला,तर आयुष्याला नव्याने दिशा मिळू शकते.याच उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून जिल्ह्यात कार्यरत असलेली समुपदेशन केंद्रे अनेकांसाठी आशेचा किरण ठरत आहेत. धाराशिव जिल्ह्यात सध्या 04 पोलीस समुपदेशन केंद्रे पोलीस स्टेशनच्या आवारात कार्यरत आहेत.
1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत या केंद्रांनी उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. धाराशिव समुपदेशन केंद्राने 209 प्रकरणांतील महिलांचे समुपदेशन केले,वाशी केंद्राने 24,कळंब केंद्राने 38 तर उमरगा केंद्राने 157 प्रकरणांतील महिलांना मार्गदर्शन केले.अशा प्रकारे एकूण 428 महिलांना या केंद्रांद्वारे आधार देण्यात आला.
समुपदेशन केंद्र म्हणजे व्यक्तींना त्यांच्या मानसिक,भावनिक, सामाजिक किंवा कौटुंबिक समस्यांवर मार्गदर्शन व मदत मिळवण्यासाठी असलेले सुरक्षित आणि विश्वासार्ह ठिकाण.येथे मानसिक तणाव,नैराश्य,चिंता यावर मार्गदर्शन केले जाते,तसेच कौटुंबिक व वैवाहिक समुपदेशन दिले जाते. मुलांचे व किशोरवयीन समुपदेशन, तसेच महिलांसाठी कौटुंबिक हिंसा किंवा छळ यांसारख्या संवेदनशील विषयांवर विशेष समुपदेशनही येथे उपलब्ध आहे.
या केंद्रांचा मुख्य उद्देश म्हणजे अडचणीत सापडलेल्या महिलांना आणि कुटुंबांना योग्य सल्ला, मानसिक आधार आणि समस्यांवर सकारात्मक तोडगा देणे.अनेक वेळा छोट्या गैरसमजांमुळे वाढलेले वाद समुपदेशनाच्या माध्यमातून मिटवले जातात आणि कुटुंब पुन्हा एकत्र येते.त्यामुळे केवळ समस्या सोडवणेच नव्हे,तर नातेसंबंध जपणे आणि समाजात सकारात्मक वातावरण निर्माण करणे हेही या केंद्रांचे ध्येय आहे.महिला व बालक,कुटुंबातील सदस्य तसेच मानसिक तणाव किंवा कोणत्याही प्रकारच्या समस्यांचा सामना करणारी कोणतीही व्यक्ती या केंद्रांचा लाभ घेऊ शकते. एकूणच,गेल्या एका वर्षात समुपदेशन केंद्रांनी केवळ आकडेवारीत यश मिळवले नाही,तर अनेक कुटुंबांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणला आहे.कोणाच्यातरी डोळ्यातील अश्रू पुसत,तुटलेली नाती पुन्हा जोडत आणि नव्या आशेचा किरण देत ही केंद्रे समाजात माणुसकीची उब जपत आहेत.
