धाराशिव (प्रतिनिधी)- जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत तसेच महाविद्यालयाकडून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अखिल भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटना, शाखा धाराशिव तर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव येथे 300 पुस्तकांचे दान करण्यात आले.
ही पुस्तके महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र चव्हाण यांना सुपूर्त करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय खुणे, सचिव डॉ. नितीन भोसले, तसेच डॉ. अभय शहापूरकर, डॉ. संजय सोनटक्के, डॉ. श्रीनिवास हंबिरे, डॉ. अभिजीत बागल आणि डॉ. अक्षय देशमुख उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी या उपक्रमामागील सामाजिक जाणीव आणि शैक्षणिक बांधिलकी अधोरेखित केली. बालरोग विभागातील डॉ. मनोज घोगरे, डॉ. शाम चौधरी आणि डॉ. निलोफर भोरी यांनी ही पुस्तके स्वीकारली व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्याचा निश्चितच उपयोग होईल, असे सांगितले. अखिल भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटना, धाराशिव शाखा भविष्यातही अशा प्रकारचे सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यास कटिबद्ध असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
