धाराशिव (प्रतिनिधी)- दि.01 मे 2026 रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्हा प्रशासनाने बैठकीस उपस्थित राहणाऱ्या मान्यवर,अधिकारी, पदाधिकारी व नागरिकांसाठी वाहतूक नियंत्रण आणि पार्किंग व्यवस्थेबाबत सविस्तर नियोजन जाहीर केले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या या महत्त्वपूर्ण बैठकीदरम्यान विविध मान्यवरांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था निश्चित करण्यात आली आहे.
बैठकीस उपस्थित राहणारे पालकमंत्री श्री.प्रताप सरनाईक व त्यांचा ताफा,जिल्हा परिषद अध्यक्ष,खासदार,आमदार, जिल्हाधिकारी,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी,पोलीस अधीक्षक,अपर पोलीस अधीक्षक, अपर जिल्हाधिकारी,निवासी उपजिल्हाधिकारी,जिल्हा नियोजन अधिकारी यांची वाहने जिल्हाधिकारी कार्यालयातील गेट क्रमांक 01 मधून प्रवेश करून निश्चित करण्यात आलेल्या पार्किंग स्थळी उभी करण्यात येतील. जिल्हा नियोजन समिती बैठकीस निमंत्रित सर्व पदाधिकाऱ्यांची वाहने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट क्रमांक 02 मधून प्रवेश करतील व नियोजित पार्किंग ठिकाणी उभी राहतील. जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभाग प्रमुख तसेच जिल्ह्यातील इतर सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची वाहने जिल्हा परिषद,धाराशिव येथील गेट क्रमांक 01 मधून प्रवेश करून जिल्हा परिषद परिसरातील पार्किंग स्थळी पार्क करण्यात येतील.
बैठकीस उपस्थित राहणाऱ्या पत्रकार बांधव व नागरिकांसाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालय,धाराशिव येथील पार्किंग स्थळ निश्चित करण्यात आले असून त्यांनी आपली वाहने तेथेच पार्क करावीत,असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व संबंधित मान्यवर,पदाधिकारी, अधिकारी,कर्मचारी,पत्रकार व नागरिकांना सूचित केले आहे की,जिल्हा नियोजन समिती बैठकीसंदर्भातील वाहतूक आणि पार्किंग व्यवस्था सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासनाने आखून दिलेल्या सूचनांचे पालन करावे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आयोजित या बैठकीत शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था आणि नियोजनबद्ध पार्किंगमुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडण्यास मदत होणार आहे.