धाराशिव (प्रतिनिधी)- जनगणना-2027 च्या पहिल्या टप्प्यात घर सूचीकरण प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल पद्धतीने राबविण्यात येणार असून नागरिकांसाठी स्व-गणना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शासनाच्या निर्देशानुसार ही सुविधा 1 मे 2026 ते 15 मे 2026 या कालावधीत se.census.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे.या उपक्रमामुळे नागरिकांना स्वतःची माहिती सुरक्षित, सुलभ आणि सोप्या ऑनलाइन पद्धतीने नोंदविता येणार आहे.
मुख्य प्रधान जनगणना अधिकारी तथा जनगणना संचालनालय, महाराष्ट्र राज्य,मुंबई यांच्या निर्देशानुसार जनगणना-2027 संदर्भातील कामकाजाला प्रारंभ झाला असून जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविणे आवश्यक करण्यात आले आहे.पोर्टल इंग्रजी, हिंदीसह विविध प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध असल्याने अधिकाधिक नागरिकांना याचा लाभ घेणे सुलभ होणार आहे.
जिल्हा प्रशासनाने सर्व विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांची 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत अनिवार्यपणे 100 टक्के स्व-गणना पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.तसेच अधिनस्त कार्यालये,संस्था व क्षेत्रीय यंत्रणांनीही तत्काळ लेखी सूचना देऊन ही प्रक्रिया 100 टक्के पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी,असे स्पष्ट करण्यात आले आहे.
शहरी व ग्रामीण भागातील सर्व नागरिकांमध्ये स्व-गणनेबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी प्रत्येक विभागाने मार्गदर्शक सूचनांचे पालन करत प्रभावी प्रचार मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या नाव व पदनामासह किमान एका मिनिटाचा व्हिडिओ संदेश तयार करून प्रसारित करावा,तसेच त्याची प्रत जिल्हा जनगणना कक्षाकडे पाठवावी,असे निर्देश आहेत.
याशिवाय बॅनर्स,सूचना फलक,डिजिटल माध्यमे,व्हिडिओ संदेश,ध्वनी संदेश,बैठका आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून स्व-गणना मोहिमेची व्यापक प्रसिद्धी करण्यावर भर देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने वेळोवेळी आढावा घेऊन कार्यवाही अहवाल सादर करण्याचे आदेशही सर्व संबंधित यंत्रणांना दिले आहेत.