तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. आशिष सोनटक्के यांनी 7 एप्रिल 2026 रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने आता त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
भाजपने प्रथमच स्वबळावर तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ताब्यात घेतल्यानंतर: प्रथम सभापतीपद सचिन पाटील यांना देण्यात आले. त्यानंतर ॲड. आशिष सोनटक्के यांची नियुक्ती झाली. या दोघांचा मिळून जवळपास 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून अजून 2 वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. सभापती पदासाठी सध्या अनेक नावे चर्चेत असली तरी माजी सभापती विजय गंगणे यांचे नाव आघाडीवर आहे. कारण बाजार समिती भाजपच्या ताब्यात आणण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
काँग्रेसकडून भाजपकडे सत्ता?
पूर्वी तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती काँग्रेसच्या ताब्यात होती. मात्र राज्य व केंद्रातील सत्तांतरानंतर भाजपने ही संस्था एकहाती ताब्यात घेतली. सध्या बाजार समिती सुरळीत सुरू असल्याने सभापतीपदासाठी मोठी चुरस आहे.
निवड बिनविरोध की संघर्ष?
आता सर्वांचे लक्ष निवड बिनविरोध की संघर्ष? याकडे लागले आहे. सभापती निवड बिनविरोध होणार? की पंचायत समितीप्रमाणे राजकीय संघर्ष पाहायला मिळणार? या प्रश्नांमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून, नागरिकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची संस्था असल्याने विरोधक भाजपमधील निवडीच्या अंतर्गत हालचाली कडे लक्ष ठेवून आहे.
सर्व पक्षांकडून हालचाली सुरू
एकूणच, पुढील सभापती निवडीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून, येणारे काही दिवस राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.