धाराशिव (प्रतिनिधी)-  शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांमुळे समाजातील गरीब, गरजू आणि वंचित घटकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत असून, त्यांच्या दैनंदिन जगण्यात दिलासा निर्माण होत आहे. अन्न, इंधन आणि आर्थिक सहाय्य या मूलभूत गरजांवर केंद्रित योजनांनी अनेक कुटुंबांना आधार दिला आहे. सरकारने उज्जवला गॅस योजना, शिवभोजन केंद्र राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम या योजनेवर कोट्यवधी रूपयांचा खर्च केल्याचे समोर आले आहे. 

शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या शिवभोजन योजनेअंतर्गत जिल्ह्यात एकूण 16 शिवभोजन केंद्र सुरू असून,ही योजना सुरू झाल्यापासून दिनांक 31 मार्च 2026 अखेरपर्यंत गरीब व गरजू व्यक्तींना तब्बल 36 लक्ष 46 हजार 777 थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर,उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत 31 मार्च 2026 अखेर जिल्ह्यात एकूण 1 लक्ष 4 हजार 129 गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले आहे.या योजनेचा उद्देश ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणे हा आहे. यामुळे महिलांना धुराच्या त्रासातून मुक्तता मिळून त्यांचे आरोग्य सुधारले आहे. 

याशिवाय,राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम,2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे जानेवारी 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी 150 रुपये व माहे एप्रिल 2024 पासून प्रतिमाह प्रति लाभार्थी 170 रुपये प्रमाणे अनुदान देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 1 लक्ष 37 हजार 512 लाभार्थ्यांना माहे एप्रिल 2025 अखेरपर्यंत एकूण 62 कोटी 11 लक्ष 38 हजार 170 रुपये  इतके अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वितरित करण्यात आले आहे.

 
Top