परंडा (प्रतिनिधी)- महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेल्या (गर्भाशयमुख कर्करोग) या आजाराबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय, परंडा येथे HPV लसीकरणाबाबत विशेष जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास नव्याने रुजू झालेले वैद्यकीय अधीक्षक डॉ.जुबेर मोमीन (बालरोग तज्ञ) यांची विशेष उपस्थिती लाभली.तसेच हा संपूर्ण उपक्रम जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.धनंजय चाकुरकर (भूलतज्ञ) यांच्या मार्गदर्शनाखाली काटेकोरपणे राबविण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित डॉक्टरांनी नागरिकांना HPV विषाणूविषयी सविस्तर माहिती देत HPV हा एक सामान्य विषाणू असून त्याच्या काही प्रकारांमुळे गर्भाशयमुख कर्करोगासह घसा, तोंड, योनी, गुदद्वार व पुरुषांमध्ये लिंग कर्करोग होऊ शकतो, असे सांगितले. तज्ज्ञांच्या मते, लसीकरण हे गर्भाशयमुख कर्करोग टाळण्यासाठी अत्यंत प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे. विशेषतः 14 ते 15 वर्षे वयोगटातील मुलींना लसीकरण करणे अत्यंत उपयुक्त ठरते, तसेच गरजेनुसार 26 ते 45 वर्षांपर्यंतही डॉक्टरांच्या सल्ल्याने लस घेता येते.योग्य वेळी लसीकरण केल्यास गर्भाशयमुख कर्करोगाचा धोका 90 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो,असेही यावेळी सांगण्यात आले. याशिवाय महिलांनी नियमितपणे Pap Smear Test करून घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. या तपासणीमुळे गर्भाशयमुखातील सुरुवातीचे बदल लवकर ओळखता येतात आणि योग्य वेळी उपचार करून गंभीर आजार टाळता येतो.
या कार्यक्रमास डॉ.देवदत्त कुलकर्णी, डॉ.अब्रार पठाण, डॉ.गजानन शेटे, डॉ.आनंद मोरे, डॉ.अभिजीत खरटमल तसेच डॉ.आशिष यांची उपस्थिती लाभली.
प्रशासकीय व परिचारिका विभागातून श्रीमती केसकर (इन्चार्ज सिस्टर), कुलकर्णी, सवताडकर, दूधकवडे, श्रीमती थिटे, श्रीमती स्वाती गोणे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.तसेच
अमोल वांबुरकर, बापू खताळ, फार्मसी ऑफिसर श्रीमती मते मॅडम, जितेंद्र ओव्हाळ तसेच इतर कर्मचारीवृंद यांनी समन्वयपूर्वक कार्य करत हा उपक्रम यशस्वी केला. या प्रसंगी उपस्थित नागरिकांना HPV लसीकरणाचे महत्त्व, महिलांच्या आरोग्याचे संरक्षण आणि कर्करोग प्रतिबंधाबाबत जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टरांनी नागरिकांना संदेश देताना सांगितले की “निरोगी व्यक्त सुदृढ कुटुंब सशक्त समाज समृद्ध राष्ट्र” आरोग्याबाबत जागरूकता आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना यांमुळेच निरोगी समाज आणि सक्षम राष्ट्राची निर्मिती शक्य आहे.
