कळंब (प्रतिनिधी)-   कळंब शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या चोऱ्यांच्या घटनांमुळे व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील मेन रोडवरील उमाकांत जगधने यांच्या मालकीच्या ‌‘श्रद्धा बॅग‌’ दुकानावर 21 तारखेच्या पहाटे अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत शटर फोडून सुमारे 15 हजार रुपयांची रोकड लंपास केली. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे, याच परिसरातील इतर अनेक दुकानांच्या शटरचे कुलूप तोडण्याचाही प्रयत्न चोरट्यांनी केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चोरट्यांचे धाडस किती वाढले आहे, याचा अंदाज येत असून व्यापारी वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शहरात वाढत्या चोऱ्या, गुंडगिरी, हाणामाऱ्या, व्यसनाधीनता व छेडछाडीच्या घटनांकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. “रात्रगस्त अपुरी आहे, पोलिसांचा धाक उरलेला नाही,” अशी तीव्र प्रतिक्रिया व्यापाऱ्यांतून व्यक्त होत आहे.

दरम्यान, कळंब पोलीस ठाण्यात मनुष्यबळाची कमतरता असल्याने गुन्हे नियंत्रणावर परिणाम होत असल्याचेही बोलले जात आहे. रिक्त पदे तातडीने भरून पोलीस यंत्रणा सक्षम करावी, तसेच शहरात रात्रीची गस्त वाढवून नागरिकांना सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी जोरदार मागणी पुढे येत आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कळंब पोलीस करत आहेत. मात्र, वाढत्या गुन्हेगारीवर लगाम लावण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालणे गरजेचे असल्याची भावना सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. 

 
Top