धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, धाराशिव येथे महिला सक्षमीकरण विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून “महिला उद्योजकता” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे आयोजन महिला सक्षमीकरण विभागाच्या अध्यक्षा डॉ. स्वाती जाधव यांच्या पुढाकाराने घेण्यात आला.
कार्यक्रमास अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष प्रमुख डॉ. मंगेश भोसले तसेच महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. आपल्या मनोगतात त्यांनी महिलांनी स्वावलंबनासाठी उद्योजकतेचा मार्ग स्वीकारणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून सरिता सूर्यवंशी तसेच सोनाली पडवळ उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या उद्योजकीय प्रवासातील अनुभव सांगत व्यवसाय सुरू करताना येणाऱ्या अडचणी, त्यावर मात करण्याचे मार्ग तसेच महिलांनी आत्मविश्वास, मेहनत आणि नियोजनाच्या जोरावर यश कसे मिळवावे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच या कार्यशाळेत महाविद्यालयातील विद्यार्थिनी बीटे वैष्णवी, पाटील मधुरा, माने निकिता, निंबाळकर ज्ञानेश्वरी यांनी प्रमुख वक्त्यांची मुलाखती घेतल्या.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व वरिष्ठ व कनिष्ठ महिला प्राध्यापक, विद्यार्थीनी तसेच शिक्षकेतर महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उपस्थितांनी कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद देत उपयुक्त माहिती मिळाल्याचे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वप्नाली गोयकर व डॉ.वैशाली बोबडे यांनी केले तर आभार प्रा. सुवर्णा गेंजगे यांनी व्यक्त केले. या कार्यशाळेमुळे विद्यार्थिनी व महिलांमध्ये उद्योजकतेबाबत जागरूकता निर्माण होऊन स्वावलंबनाची प्रेरणा मिळाली.
