भूम (प्रतिनिधी)- टाकळी-पाटोदा-भूम-वारदवाडी राज्यमार्ग क्र. 62 वरील भूम शहरातील रस्त्याच्या दोन्ही बाजूंवरील अनाधिकृत अतिक्रमण हटविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग, भूम यांच्या वतीने गाळेधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. संबंधित अतिक्रमणधारकांना तीन दिवसांच्या आत अतिक्रमण स्वतःहून काढून टाकण्याचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.
सध्या या मार्गावर नवीन सिमेंट काँक्रीट नाल्यांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. मात्र, रस्त्याच्या हद्दीत दोन्ही बाजूंना नाल्यावर व बाजूपट्ट्यावर उभारण्यात आलेल्या पत्र्याच्या टपऱ्या, शेड्स, कच्ची व पक्की दुकाने, हॉटेल्स, लोखंडी अँगल, पोल आदी बेकायदेशीर अतिक्रमणामुळे नाली बांधकामात मोठा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे कामाच्या गतीवर परिणाम होत असून नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
नोटिसामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, रस्त्याच्या मध्यभागापासून 12 मीटर उजव्या व 12 मीटर डाव्या बाजूस असलेले सर्व अतिक्रमण तात्काळ हटविणे आवश्यक आहे. अन्यथा या अतिक्रमणामुळे अपघात किंवा दुर्घटना होऊन जीवित व वित्तहानी झाल्यास संबंधित अतिक्रमणधारक स्वतः जबाबदार राहतील.
तसेच, दिलेल्या मुदतीत अतिक्रमण काढून न घेतल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग पोलीस बंदोबस्तात कारवाई करून अतिक्रमण हटवेल व त्यासाठी लागणारा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. अतिक्रमण हटविताना झालेल्या नुकसानीस विभाग जबाबदार राहणार नसल्याचेही नोटिसीत नमूद करण्यात आले आहे.
ही कारवाई उपविभागीय अभियंता आर. आर. गिराम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून, कनिष्ठ अभियंता एस. आर. उघडे, बी. आर. खुणे, एम. एम. कुलकर्णी, अमोल जरांडे व एस. पी. जाधवर हे अधिकारी अतिक्रमणधारकांना प्रत्यक्ष नोटिसा बजावत आहेत. दरम्यान, प्रशासनाच्या या भूमिकेमुळे शहरात अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडाली असून, येत्या काही दिवसांत रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची मोठी मोहीम राबवली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
