तुळजापूर (प्रतिनिधी)-  शहरातील जुने बसस्थानक परिसरात दोन अनोळखी इसमांनी सोन्याचे बिस्किट सापडल्याचा बनाव करून एका वृद्ध महिलेची सुमारे 90 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.

याबाबत पार्वती कृष्णकुमार राठोड (वय 60, रा. गोकुळ नगर, रोहीणी नगर 3, सैफुल, जि. सोलापूर) यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, त्या गुरुवारी (दि. 26 मार्च 2026) सकाळी सुमारे 8.30 वाजण्याच्या सुमारास जुने बसस्थानक परिसरातून जात असताना दोन अनोळखी इसमांनी त्यांना गाठले.

या इसमांनी “10 तोळ्याचे दोन सोन्याचे बिस्किट सापडले” असा बनाव करून त्यातील एक बिस्किट राठोड यांना देत विश्वास संपादन केला. संबंधित बिस्किट खोटे असल्याचे नंतर उघड झाले. त्यानंतर त्यांनी राठोड यांच्याकडील दोन तोळ्याचे सोन्याचे मिनी गंठण (अंदाजे किंमत 90 हजार रुपये) घेऊन पसार झाले. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 318(4), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

 
Top