धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ आणि सातारा जिल्हा कलाध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 44 वी राज्यस्तरीय कलाशिक्षण परिषद (कार्यशाळेचे) भव्य आयोजन करण्यात आले आहे. 28 आणि 29 मार्च 2026 रोजी स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह, जिल्हा परिषद सातारा येथे हा सोहळा संपन्न होणार आहे.
दिग्गजांच्या उपस्थितीत होणार उद्घाटन
शनिवार, 28 मार्च रोजी सकाळी 12:00 वाजता राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार ना. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत परिषदेचे उद्घाटन होईल. यावेळी कला क्षेत्रातील अनेक नामवंत अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी
दोन दिवसांच्या या परिषदेत कलाशिक्षकांसाठी वैचारिक आणि प्रात्यक्षिक अशा दोन्ही स्तरावर भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे: प्रात्यक्षिके: चित्रकार ओंकार पवार, सत्यजित वरेकर आणि युवा शिल्पकार मंदार लोहार यांची थेट प्रात्यक्षिके पाहण्याची संधी मिळणार आहे. चर्चासत्रे: रंगरेषा ते डिझाईन : सृजनात्मक प्रवास आणि नवीन शैक्षणिक धोरण मधील कलाशिक्षणाचे स्थान या विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. करिअर संधी: कला क्षेत्रात उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधी आणि जागतिक स्तरावरील आर्ट स्टुडिओबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. पुरस्कार सोहळा: राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्कार वितरण आणि कलाध्यापकांचा गौरव सोहळाही या परिषदेचे मुख्य आकर्षण असणार आहे.
समारोप आणि सांस्कृतिक कार्यक्रम
रविवारी 29 मार्च रोजी सायंकाळी 4:00 वाजता परिषदेचा समारोप होईल. याप्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे,पर्यटन मंत्री ना. शंभूराज देसाई आणि इतर मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करतील. परिषदेच्या दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम, निसर्गचित्र स्पर्धा , फलक लेखन स्पर्धा आणि कलाशिक्षक खुला मंच असे उपक्रमही राबवले जाणार आहेत.
राज्यातील कलाशिक्षकांच्या दृष्टीने
महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळाचे राज्यअध्यक्ष नरेंद्र बाराई यांनी या परिषदेचे महत्व अधोरेखित करताना सांगितले की, “बदलत्या शैक्षणिक धोरणात कलेचे स्थान आणि कलाशिक्षकांचे भविष्य यावर या परिषदेत मंथन होणार आहे. तरी महाराष्ट्रातील जास्तीत जास्त कलाशिक्षक, कलाप्रेमी, कलाकार आणि चित्रकारांनी या कलाकुंभात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.“
तसेच धाराशिव जिल्हा कलाध्यापक संघाचे जिल्हाकार्याध्यक्ष कलाध्यापक शिवाजी भोसले , जिल्हाध्यक्ष कलाध्यापक नानासाहेब बोराडे , जिल्हासचिव कलाध्यापक शेषनाथ वाघ जिल्हाकोषाध्यक्ष किरण वाघमारे यांनी धाराशिव जिल्ह्यातील तमाम कलाध्यापक बांधनांनी या परिषदेस उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले यासाठी मा. शिक्षणाधिकारी माध्यमिक जि.प.धाराशिव यांचे पत्र ही काढण्यात आले आहे . या परिषदेच्या यशस्वीतेसाठी सातारा जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष उमेश देशमुख आणि सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
