धाराशिव (प्रतिनिधी)- तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, धाराशिव येथे तिथीनुसार संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा 396 वा जन्मोत्सव दिनांक 6 मार्च 2026 रोजी पारंपरिक पद्धतीने व मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या निमित्ताने दिनांक 2 मार्च ते 6 मार्च 2026 या कालावधीत विविध धार्मिक, शैक्षणिक, क्रीडा, तांत्रिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी इतिहास तज्ञ डॉ. सतीश कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम शिवछत्रपतीच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांची ढोल ताशांच्या गजरात पालखी काढण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, विभागप्रमुख डॉ.डी डी दाते, डॉ.प्रशांत कोल्हे, प्रा. सुजाता गायकवाड, प्रा.एस एम पवार, प्रा. पी. एम.पवार, डॉ.प्रीती माने, प्रा.सुनीता गुंजाळ, कार्यक्रम समन्वयक डॉ.राजश्री यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. सतीश कदम म्हणाले की, आज आपण बोली भाषेत सहज तुमच्यासाठी काय पण म्हणतो! पण इतिहासाचा आढावा घेतला तर छत्रपती शिवरायांच्या अनेक मावळ्यांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी अभूतपूर्व लढाईत आपल्या स्वतःच्या जीवाची परवा न करता बलिदान दिलेले आहे. आणि शिवछत्रपतींसाठी “तुमच्यासाठी काय पण!“ हे सिद्ध करून दाखविले आहे. त्याचा आपण विसर पडू देऊ नये. इतिहासाचे अनेक दाखले देत शिवछत्रपतींचा रंजक इतिहास त्यांनी विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखविला. त्यावेळी विद्यार्थी मंत्रमुग्धपणे त्यांचे विचार ऐकत होते. अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले की, पारंपरिक कार्यक्रम घेण्याची तेरणाची समृद्ध परंपरा असून शिवजन्मोत्सव विद्यार्थी दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतात. अशा कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणा मिळते. यावर्षी विद्यार्थ्यांनी किल्ला बांधणी करून आपल्यातील उत्कृष्ट अभियंत्याचे दर्शन घडविले. याचा आनंद वाटतो.
पुढे बोलताना डॉ. माने असे म्हणाले की संस्थेचे विश्वस्त आमदार राणाजगजीत सिंह पाटील साहेब विद्यार्थ्यांच्या हितासाठी सतत प्रयत्नशील असतात.यावर्षी कमीन्स स्कॉलरशिप साठी चार विद्यार्थी पात्र झाले असून त्यांना नुकतेच या कार्यक्रमात लॅपटॉपचे वाटप करण्यात आले. तसेच संपूर्ण शैक्षणिक फी सवलत ही या विद्यार्थ्यांना मिळालेली आहे. लॅपटॉप मिळालेल्या क्षितिज गवारे, हर्ष बांगड, सूर्या मुंडे आणि राजवर्धन अवताडे या विद्यार्थ्यांचे प्रमुख पाहुण्यांचे हस्ते विशेष कौतुक आणि स्वागत करण्यात आले.
या महोत्सवाची सुरुवात दिनांक 2 मार्च रोजी प्रथम वर्ष अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी आयोजित एआय टूल्स प्रशिक्षण कार्यक्रमाने झाली. या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता संबंधित आधुनिक साधने, त्यांचा वापर आणि तंत्रज्ञानातील नवीन संधी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी महाविद्यालयात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत मुलांचे आठ, मुलींचे चार तसेच प्राध्यापकांचे दोन संघ सहभागी झाले. खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत स्पर्धेला रंगत आणली.
तेरणाच्या इतिहासात यंदाचा शिवजन्मोत्सव विशेष गाजला तो किल्ला बांधणी स्पर्धा (गडोत्सव) आयोजित करून. या स्पर्धेत आठ संघांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी विविध ऐतिहासिक किल्ल्यांच्या आकर्षक प्रतिकृती साकारत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यकालीन इतिहासाची झलक सादर केली.
यावेळी ॲप्टिट्यूड टेस्ट, कोडिंग क्विझ स्पर्धा आणि कोडिंग बॅटल स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी तांत्रिक कौशल्य व बौद्धिक क्षमतेचे उत्कृष्ट प्रदर्शन करत स्पर्धेत आपली गुणवत्ता सिद्ध केली.
महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखी मिरवणुकीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या मिरवणुकीत महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व कीर्तनकार सागर सलगरे यांनी पालखीचे नेतृत्व केले. ढोल-ताशा व लेझीम पथकाच्या तालावर विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेतला. यावेळी विविध कंपन्यांमध्ये व शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अनिकेत कोळगे यांच्यासह सुमारे 50 माजी विद्यार्थ्यांचा प्रमुख अतिथी डॉ. सतीश कदम, प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने व सर्व विभाग प्रमुखांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले. बाल शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत केवीत अजिंक्य काळे यांचा पाळणा सोहळा सादर करण्यात आला. प्रथम वर्ष फार्मसी विभागातील जिजाऊ ग्रुप व तृतीय वर्ष फार्मसी विभागातील शिवकन्या ग्रुप यांनी पारंपरिक लोकनृत्य सादर केले. तसेच अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित प्रभावी पथनाट्य सादर केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. तसेच विद्यापीठस्तरीय अविष्कार, स्विमिंग व क्रिकेट स्पर्धांमध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय कमिन्स स्कॉलरशिप प्राप्त विद्यार्थ्यांना लॅपटॉपचे वितरण करण्यात आले. तसेच महाविद्यालयातील विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्राध्यापकांनाही प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पूजा मुंडे यांनी तर डॉ. राजश्री यादव यांनी आभार प्रदर्शन केले.
या महोत्सवासाठी प्रा. आर एम शेख, प्रा.अमृता पिंपळे आणि प्रा. आर. ए.टेकाळे, कार्यक्रम समन्वयक म्हणून डॉ. राजश्री यादव यांनी यशस्वीपणे काम पाहिले. ढोल-ताशा पथकासाठी प्रा. संदीप नलगे, प्रा. आर. ए. दंडनाईक, प्रा. आकाश जगताप; सांस्कृतिक कार्यक्रमासाठी प्रा. वर्षा बोंदर, प्रा. सायली पवार व प्रा. सुकेशनी घणगावे; तसेच स्टेज व्यवस्थापन व अँकरिंगसाठी प्रा. पूजा मुंडे, प्रा. सुरज इंगळे व प्रा. रोहिणी बोंडगे यांनी विशेष परिश्रम घेतले. पारितोषिक वितरणासाठी प्रा. के. जी. डोलारे, प्रा. बी. एस. चव्हाण व प्रा. डी. डी. मुंडे यांनी सहकार्य केले.

